पुणे : दैनिक “प्रभात’ जनमत चाचणीत नोंदवल्या प्रतिक्रिया

95 टक्‍के पालक पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत अनुकूल

पुणे – राज्य शासनाने शुक्रवारी शाळा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी अनुकूल आहेत का? सरकारच्या या निर्णयाविषयी त्यांची काय प्रतिक्रिया आहे? हे जाणून घेण्यासाठी दैनिक “प्रभात’च्या डिजिटल माध्यमावर जनमत चाचणी घेण्यात आली. राज्यातील 2 हजारांहून अधिक पालकांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.

दै. “प्रभात’ जनमत चाचणीमध्ये सहभागी झालेल्यांपैकी 95 टक्‍के पालकांनी शाळा सुरू करण्याच्या निर्णयास पाठिंबा दर्शवला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून करोनासंबंधित नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे मत बहुतांश पालकांनी नोंदवले.

तर, दुसरीकडे शाळा सुरू करण्यास विरोध करत असलेल्या पालकांनी मुलांचे अद्याप लसीकरण झाले नसल्याच्या विषयाकडे लक्ष वेधले. सरकारने लसीकरणानंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता, असे मत शाळा सुरू करण्यास विरोध करत असलेल्या पालकांनी नोंदवले.