Pune: निवडणुक रोखे प्रकरणातील कंपन्यांनी भरले रिंग रोडचे टेंडर

पुणे – निवडणूक रोखे अर्थात इलेक्टोरल बाॅंड प्रकरणात राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगी दिल्यामुळे देशभरात चर्चेत आलेल्या मेघा इंजिनिअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, नवयुग इंजिनिअरिंग कंपनी यांनी पुणे जिल्ह्यातील रिंग रोड प्रकल्पासाठी निविदा भरल्या आहेत. त्यामुळे आता पुणे रिंगरोडचे काम कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे, यासाठी एकूण बारा कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. त्यामध्ये निवडणूक रोखे प्रकरणात नाव पुढे आलेल्या कंपन्यांचा देखील समावेश आहे.

पीएमआरडीएकडून पूर्व व पश्‍चिम अशा दोन टप्प्यात रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याची एकूण लांबी १२२ किमी असून रुंदी सुमारे ११० मीटर इतकी असणार आहे. यामध्ये पूर्व रिंगरोड हा ७१.३५ किमी लांबीचा तर पश्चिम रिंगरोड हा ६५.४५ किमी लांबीचा आहे. पश्चिम भागातील रिंगरोडसाठीचे भूसंपादन जवळपास ऐंशी टक्के झाले आहे. या रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यासाठी पाच टप्पे अर्थात पाच पॅकेज करण्यात आले आहे.

तर, पूर्व रिंगरोड मार्गिकेचे देखील भूसंपादन गतीने सुरू आहेत. दोन्ही टप्प्यातील मिळून रिंगरोडचे आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक भूसंपादन झाले आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत १६ एप्रिलपर्यंत होती. ही मुदत नुकतीच संपुष्टात आली आहे. दरम्यान, रिंगरोडच्या कामासाठी १२ कंपन्यांनी निविदा भरल्या असून, त्यामध्ये भारतीय आणि परदेशातील कंपन्यांनीही निविदा भरल्या आहेत.