पुणे : प्रजासत्ताक संचालनासाठी पुणे विद्यापीठाच्या १२ विद्यार्थिनींची निवड

पुणे – महाराष्ट्रातील एनएसएसच्या १२ विद्यार्थिनींची ७५ व्या प्रजासत्ताकदिनी संचलनासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तीन विद्यार्थीनींचा समावेश आहे.

यंदा येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर संचलनाची संधी केवळ मुलींनाच देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून पुणे विद्यापीठाच्या अक्षदा देशपांडे, समीक्षा साळवे, आणि भूमिका गुप्ता या तीन विद्यार्थिनींना ही संधी मिळाली आहे.

अन्य विद्यापीठातील भाग्यश्री गेनवार, गायत्री पाटील, रश्मी तिवारी, स्नेहा जाधव , ब्युटी सिंग, काशिका यादव, रुची दैगव्हाने ,संस्कृती पेटकर , रिया परदेशी अशा एकूण १२ मुलींची संचलनासाठी निवड करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थीनींमध्ये समीक्षा साळवे ही आळंदी येथील एमआयटी कॉलेजची, तर अक्षदा देशपांडे ही नाशिक येथील एमव्हीपी लॉ कॉलेजची असून, भूमिका गुप्ता ही ताथवडे येथील जेएसपीएम राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनियरिंगची विद्यार्थिनी आहे.

या विद्यार्थिनींना राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.सदानंद भोसले यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी या तीन विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.