PUNE: दिवेघाटात सेल्फी नव्हे अ‍ॅक्सिडंट पॉईंट

फुरसुंगी – पुणे-सासवड मार्गावरील ऐतिहासिक दिवेघाटाच्या माथ्यावर सेल्फी पाईंट तयार झाला आहे. याठिकाणी शनिवार आणि रविवार अशा सुट्ट्ीच्या दिवशी मोठी गर्दी होत असून यातून घाटातील या वळणावर वाहतूक कोंडी होत आहे. घाटात या ठिकाणी थांबण्यास बंदी असतानाही वाहतूक पोलिसांकडून मात्र येथे भरणार्‍या जत्रेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मोठा अपघात घडल्यानंतर प्रशासन कार्यवाही करणार का? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पुणे शहराजवळ असलेलाच दिवेघाट आता विकेंड एन्जॉयचे लोकेशन झाला आहे. शनिवार-रविवार मौजमजा करण्यासाठी मोठ्या संख्यने नागरिक दिवेघाट माथ्यावरील या वळणावर थांबत आहेत. याठिकाणी उभारलेल्या विठ्ठल मूर्तीजवळही फोटोसेशनसाठी गर्दी होत आहे. यातून पर्यटनास चालना मिळते, खाद्यपदार्थ, हॉटेल व्यावसाय तेजीत येतात. या बाबी चांगल्या असल्या तरी दिवेघाटात शेवटच्या वळणार तयार झालेल्या सेल्फी पॉईंटवर होणारी गर्दी धोकादायक ठरत आहे.

या ठिकाणी पर्यटक थांबत असल्याने खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तू विक्री करणार्‍या गाड्या थांबत आहेत, यातून अधिकच गर्दी वाढत आहे. घाट उतरणारी वाहने वेगाने असतात तसेच घाटाचा शेवटचा टप्पा असल्याचे घाट चढणारी वाहनेही वेगाने असतात, यातून पर्यटक अगदी रस्त्यापर्यंत गर्दी करीत असल्याने मोठा अपघात होण्याचा धोका आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष 

लोणीकाळभोर व सासवड पोलीस ठाण्याच्या सीमेवर हा भाग येत असुन येथे गर्दी करणार्‍यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु, पोलिसांचे मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष आहे.