पुणे: सिंहगड रस्त्यावरील कोंडी सुटण्यास मदत होणार

रिंगरोड तयार करण्यासाठीही सर्वतोपरी सहकार्य : गडकरी
पुणे मेट्रोच्या वेगवान कामाबाबत समाधान

पुणे  – “पुण्याची ओळख सुंदर आणि प्रदूषणमुक्‍त शहर म्हणून होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत. पुणे शहरालगतचे रिंगरोड तयार करण्यासाठी आवश्‍यक सहकार्य करण्यात येईल,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाइम थिएटर उड्डाणपुलाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्‍ता टिळक, सुनील कांबळे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्‍त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेविका मंजुषा नागपुरे, ज्योती गोसावी, नगरसेवक श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप आणि भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यावेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, “सिंहगड रोड उड्डाणपुलामुळे वाहतूक समस्या सोडवण्यास मदत होणार आहे. या पुलावर “डबलडेकर’ सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पुणे-मुंबईसह राज्याला केंद्र सरकारकडून जेवढी मदत देता येईल, तेवढी दिली जाईल. पुणे मेट्रोचे काम गतीने सुरू आहे, ही चांगली बाब आहे. नदी सुधार, रोप-वे व अन्य विकास प्रकल्पांसाठी सहकार्य केले जाईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. यावेळी त्यांनी शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली.

शहरात सुरू असलेली विविध विकासकामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. विकासाची कामे करताना नागरिकांच्या सुविधेचा प्राधान्याने विचार करावा. त्यांना समस्या येणार नाहीत, याकडेही लक्ष द्यावे. केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या समन्वयातून ही कामे करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारतर्फे करण्यात येणारे विकास प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी राज्याकडूनही पूर्ण सहकार्य करण्यात येईल.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री

पर्वतीसह सिंहगडावरही रोप-वे
“सिंहगडावर जाण्यासाठी रोप-वे उभारण्यास केंद्र व राज्याने मदत करावी, अशी मागणी यावेळी खासदार गिरीश बापट यांनी यावेळी केली. त्यावर “आपण पुण्यात सुट्टीत येत होतो. त्यावेळी पर्वतीवर नेहमी जात असे. त्यावेळी हवा शुद्ध होती. तसेच ती गोडही वाटायची. मात्र, आता पुणे प्रदूषित झाले आहे. केंद्रात आता आपल्याकडेच हे खाते असल्याने सिंहगड, पर्वतीसह जे काही रोप-वे असतील, त्याचे प्रस्ताव पाठवावेत. त्यास मान्यता दिली जाईल,’ असे आश्‍वासन गडकरी यांनी यावेळी दिले.

फ्लेक्‍सबाजांना इशारा
या कार्यक्रमानिमित्त परिसरातील फ्लेक्‍सबाजीवरून गडकरींसह सर्वच उपस्थित नेत्यांनी नाराजी व्यक्‍त केली. “विकासकामांसाठी निधी कमी पडत असल्याने यापुढे अजित पवारांनी पुण्यात लागणाऱ्या फ्लेक्‍सवर दंड आकारावा. तसेच त्या शुल्कातून विकासकामांसाठी निधी खर्च करावा,’ असा टोला फ्लेक्‍स लावणाऱ्या नगरसेवकांना गिरीश बापट यांनी लगावला. तोच धागा पकडत आमदार डॉ. गोऱ्हे यांनी “हा निर्णय घ्यायचा असेल तर आधी तुमचाच खिसा कापावा लागेल’ अशी कोपरखळी खासदार बापट यांना लगावली. शहरात सध्या सर्वत्र भाजपचीच फ्लेक्‍सबाजी जास्त असल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.