PUNE: प्रोस्टेट ग्रंथीवर अवघ्या दहा मिनिटांत शस्त्रक्रिया शक्य

पुणे – प्रोस्टेट ग्रंथीवर अवघ्या दहा मिनिटांत विना त्रासदायक शस्त्रक्रिया करून काही तासांत डिस्चार्ज देणे आता शक्य आहे. ‘रिझूम थेरपी’ या नव्या तंत्रज्ञानामुळे बाणेर येथील युरोकुल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये भारतातील ही पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यामुळे रुग्ण काही तासांत डिस्चार्ज घेऊन घरी गेला, अशी माहिती ‘युरोकुल’चे संस्थापक व युरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, प्रख्यात युरॉलॉजिस्ट डॉ. संजय कुलकर्णी यांनी दिली.

बाणेर येथील युरोकुल रुग्णालयात यावेळी पहिल्या महिला लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, युरॉलॉजिस्ट डॉ. पंकज जोशी, बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे, रेडिओलॉजिस्ट डॉ. साकेत पटवर्धन, युरोकुलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय चौधरी, प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रमोद भावे यांच्यासह रुग्ण व यंत्र पुरवणाऱ्या टीमची यावेळी उपस्थिती होती.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, प्रोस्टेट ग्रंथींवरील पारंपरिक शस्त्रक्रियेला ‘ट्रांसूरेथ्रल रिसेक्शन ऑफ द प्रोस्ट्रेट’ (टीयूआरपी – TURP) म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये रुग्णाला साधारण दोन ते तीन दिवस रुग्णालयात राहावे लागते. असह्य वेदना होत असतात, ही शस्त्रक्रिया तासभर चालते. त्यावर रिझूम थेरपी तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत प्रोस्टेट ग्रंथींचा वाढलेला भाग पाण्याच्या वाफेच्या साहाय्याने विरघळून टाकता येतो. ही थेरपी सामान्यत: बाह्यरुग्ण प्रक्रिया म्हणून केली जाते. या यंत्रामुळे प्रोस्टेट ग्रंथीवरील उपचार अवघ्या दहा मिनिटांत होणार आहे.

“या तंत्रज्ञानाच्या यशाचा दर ८० टक्क्यांपेक्षा अधिक असून, तरूण रुग्णांना याचा फायदा होणार आहे. य तंत्रज्ञानामुळे प्रोस्टेट ग्रंथीच्या सर्व रुग्णांवर विनात्रास शस्त्रक्रिया होणार असून, अवघ्या काही दिवसांत त्याचा चांगला परिणाम दिसून येईल.”  – डॉ. संजय कुलकर्णी, युरॉलॉजिस्ट, युरोकुल हाॅस्पिटल