PUNE: शिक्षकेतर संघटनेचे आज ५१ वे राज्यव्यापी अधिवेशन

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे ५१ वे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार (दि.७) सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) मधील जिमखाना मैदान येथे होणार आहे. महामंडळाच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये शिक्षकेतर बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर विचारविनिमय, चर्चासत्र, परिसंवाद होणार असून यामध्ये अनेक तज्‍ज्ञ विचारवंतांचे मार्गदर्शन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे, जयंत आसगावकर, आमदार वैभव राऊत, रवींद्र धंगेकर, नितेश राणे, रमेशदादा पाटील, पदवीधर आमदार निरंजन डावखरे, सत्यजित तांबे, माजी खासदार सुधीर सावंत उपस्थित राहणार आहेत. राज्यातील शिक्षकेतर बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी केले आहे.

महामंडळाच्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, आश्र्वासित प्रगती योजना, अनुकंपा तत्त्वावरील पदांची नियुक्ती, जुनी पेन्शन योजना तसेच वैद्यकीय, रजा देयके असे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. यावर चर्चा आणि विचारविनिमय आणि संघटनेची पुढील ध्येय धोरणे ठरविली जाणार आहेत, अशी माहिती खांडेकर यांनी दिली.