पुणे – आवर्तनाचा कालावधी प्रशासनाने वाढविला

दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळणार

पुणे – खडकवासला धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात येणारे आवर्तन दि.7 मेपर्यंत सोडण्यात येणार होते. मात्र, ग्रामीण भागात वाढत असलेली पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर हे आर्वतन वाढविण्यात आले असून येत्या शुक्रवारपर्यंत (दि.10) कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या भागांना दिलासा मिळणार आहे.

दौंड, इंदापूर आणि हवेली या तालुक्‍यांसाठी खडकवासला धरणातून शेती आणि पिण्यासाठी दि.11 एप्रिलपासून आर्वतन सोडण्यात येत आहे. 2.68 टीएमसी इतके पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याविषयीचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. 27 दिवसांसाठीच हे आर्वतन होते. त्यानुसार हे आर्वतन दि. 7 मे पर्यंतच होते. मात्र ग्रामीण भागातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन आवश्‍यक ते पाणी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी पाटबंधारे विभागाला दिले. त्यानुसार येत्या शुक्रवारपर्यंत कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Comment