Pune : उन्हाचा तडाख्याने फळभाज्यांची आवक घटली

पुणे – उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाने नुकसान झाल्यामुळे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक घटली आहे. येथील बाजारात रविवारी (दि. २१) राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची सुमारे ८० ते ९० ट्रक आवक झाली होती. आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या भावात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर आवक वाढल्याने केवळ भुईमूग शेंगांच्या भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

पराराज्यातून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे ८ ते १० टेम्पो, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून तोतापुरी कैरी प्रत्येकी ३ टेम्पो, कोबी ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा २ ते ४ टेम्पो, हिमाचल प्रदेशातून मटार ६ ट्रक, कर्नाटक येथून पावटा २ ते ३ टेम्पो आणि भुईमूग शेंगा ३ टेम्पो, तर आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा ७ टेम्पो, राजस्थान येथून गाजर १ ट्रक, तर मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे १० टेम्पो आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ६०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ७ हजार पेटी, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, सिमली मिरची ८ ते १०, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ५ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भुईमूग शेंगा २५ ते ३० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, मटार पारनेर येथून २ टेम्पो, कांदा सुमारे ७० ते ८० ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० टेम्पो आवक झाली होती.