PUNE: जितका वापर, तितकेच वीजेचे रिचार्ज

पुणे – महावितरणकडून राज्‍यात स्‍मार्ट प्रीपेड वीजमीटर बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्‍या अंतर्गत पुण्यात एकूण ३६ लाख ८७ हजार ४७३ मीटर बसविण्यात येणार आहेत. प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांना आर्थिक गरजेनुसार आपला वीजवापर निश्चित करता येणार आहे. हे वीजमीटर मोफत बसविले जाणार आहेत. येत्या मार्चपासून हे मीटर टप्प्याटप्प्याने पुण्यात बसविण्याचे काम सुरू होईल.

विजेच्या व नवीन वीजजोडण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्‍यानुसार महावितरणकडून वीजमागणी व पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी वीज गळती रोखण्यासोबत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्‍या अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचे व विजेच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा ग्राहकांना अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येत आहे.

असा होईल फायदा

सध्या महावितरणचे पश्चिम महाराष्ट्रात ६८ लाख ४० हजार ग्राहक असून, त्‍यांना बिल देण्यासाठी घरोघरी जाऊन प्रत्‍येक महिन्‍याला मीटरचे फोटो रीडिंग घेणे, त्यानुसार वीजबिल तयार करणे व बिलांचे वितरण करणे या प्रक्रियेत काही दिवसांचा कालावधी लागतो. तसेच घराला कुलूप असल्याने रीडिंग न घेता येणे, चुकीचे असल्यास दुरुस्ती करणे, मीटर नादुरुस्त होणे तसेच वीजबिलांचा भरणा न होणे, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे अशी कारणे समोर येतात.

त्यामुळे स्मार्ट मीटरिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वीजग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटर अत्यंत उपयुक्त असून त्यामुळे विजेवरील खर्च नियंत्रणात राहील. पाहिजे तेवढाच वीजवापर करता येईल आणि बिलिंगच्या तक्रारी संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.