पुणे : प्रदूषण वाढल्यावर महापालिकेला आली जाग

टॅंकरद्वारे पाणी पुरवून सुरू करणार ड्राय मिस्ट फाउंटन; यंत्रणा बसवण्यास स्वयंसेवी संस्थेचाही विरोध

पुणे – राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषण वाढल्याने प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने यंत्रणा उभारण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांपूर्वी उभारलेले, मात्र त्यानंतर बंदच असलेले फाउंटन अखेर सुरू होणार आहेत. याला पाण्याचे नळजोड नसल्याने हे बंद असलेले कारंजे टॅंकरने पाणी आणून सुरू केले जाणार आहेत. दिवाळी संपताच या कारजांना स्वतंत्र नळजोड दिले जाणार आहेत.

पालिकेने शहरात 30 ठिकाणी मिस्ट फाउंटन बसवण्याचा निर्णय घेतला होता. जी-20 परिषदेच्या निमित्ताने यातील 10 कारंजी बसवण्यात आली, तर उर्वरित 20 फाउंटन महापालिकेस 15 व्या वित्त आयोगांतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी मिळालेल्या 317 कोटी रुपयांच्या निधीतून बसविण्यात येणार आहेत.

वाहनांद्वारे होणारे प्रदूषण, नागरीकरण वाढल्याने बांधकामे आणि रस्त्याकडेला असलेल्या धुळीतून पीएम-10 हे धोकादायक धूलिकण वाढले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने शहरात 10 ठिकाणी ड्राय मिस्ट फाउंटन (धूळ रोखणारे पाण्याचे कारंजे) बसवले होते. या फाउंटनला “परिसर’ या पर्यावरण अभ्यासक संस्थेने विरोध केला आहे.

ड्राय मिस्ट फाउंटनमुळे कुठेही प्रदूषण कमी झाल्याचा अभ्यास झालेला नाही. तसेच त्याचा फायदा किती होतो हे निश्‍चित झालेले नाही. अशा स्थितीत हा अनावश्‍यक खर्च असून ही यंत्रणा महापालिकेने बसवू नये, अशी मागणी संस्थेने केली आहे.

टॅंकरने देणार पाणी
महापालिकेने पहिल्या टप्प्यात ही दहा फाउंटन उभारताना, त्या जागेवर हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्‍या उभारल्या आहेत. मात्र, नळ तसेच विद्युत जोड न घेताच याचे उद्‌घाटन केले. हे फाउंटन विद्युत विभागाने निविदा काढून उभारले त्यानंतर त्याची जबाबदारी पर्यावरण विभाग अथवा भवन विभागाकडे देणे आवश्‍यक असते. मात्र, या कोणत्याही विभागात समन्वय नसल्याने हे बंदच पडले. त्यामुळे हे फाउंटन सुरू करताना त्यांना सुरूवातीला टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे, तर दिवाळीनंतर कामयस्वारुपी नळजोड दिले जाणार आहेत.