PUNE: पुढील दशक प्रचंड तंत्रज्ञान बदलाच्या क्रांतीचे असेल

पुणे – गेल्या दशकात जितकी प्रगती झाली तेवढी आजवरच्या मानवी इतिहासात झालेली नाही. आगामी दशकात आणखी प्रचंड वेगाने बदल होणार असून हे पुढील दशक प्रचंड तंत्रज्ञान बदलाच्या क्रांतीचे असेल. त्यादृष्टीने आपल्यालाही सातत्याने बदलत राहून स्वतःला सज्ज ठेवावे लागेल, असे मत विख्यात माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ व प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठाच्या वतीने संस्थापक – कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त आयोजित डॉ. पतंगराव कदम स्मृती व्याख्यानमालेचे उदघाटन करताना ते बोलत होते. ‘मानवी जीवनासमोरील तंत्रज्ञानाची आव्हाने व संधी’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, सहकार्यवाह डॉ.एम. एस. सगरे व. भा. म्हेत्रे, कुलसचिव जी. जयकुमार, विचार भारतीचे संपादक प्रा. मिलिंद जोशी, प्राचार्य डॉ. मंदार करमरकर, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ.अभिजीत पाटील, राजेंद्र उत्तुरकर यावेळी उपस्थित होते. विचार भारतीच्या डॉ. पतंगराव कदम जयंती विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डाॅ. गोडबोले म्‍हणाले, उद्याचे जग प्रचंड वेगाने बदलत जाणार आहे. आपण आज जे काम करतोय त्यात आमूलाग्र बदल होत जाणार आहेत. त्यामुळे लर्निंग-अनलर्निंग सातत्याने करावे लागणार आहे. थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रात मोठीच क्रांती व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याद्वारे मंदिरे, पूल, इमारती बांधल्या जाऊ लागल्या आहेत. एकुणात आपले जीवन तंत्रज्ञानाने व्यापले जाणार आहे.

डॉ. सावजी म्हणाले, आपण भारती विद्यापीठातून उद्याचे नेतृत्व घडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यांना कशा रीतीने तयार करायचे, कोणते बदल करावे लागतील याची दिशा अच्युत गोडबोले यांच्या विचारांतून मिळाली आहे. प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र उत्तुरकर यांनी आभार मानले. डॉ.ज्योती मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले.

जगातील सगळी कार्यालये म्युझियम बनतील !

उद्याचे जग इतके झपाट्याने बदलते आहे की त्यापासून आपण दूर राहू शकणार नाही. तंत्रज्ञान इतक्या वेगाने आपल्या जीवनाचा भाग बनेल आणि सगळ्या गोष्टी ऑनलाइन होतील की नोटा, नाणी सगळं बंद होईल. येत्या २५-३० वर्षात एकाही ऑफिसची गरज पडणार नाही. त्यामुळे ही रिकामी कार्यालये म्युझियम बनून जातील. या बाबी सायन्स फिक्शन किंवा काल्पनिक वाटल्या तरी त्या प्रत्यक्षात येणार आहेत, असे प्रतिपादन अच्युत गोडबोले यांनी केले.