PUNE: किरकोळ बाजारात लसणाचे भाव गगनाला!

पुणे – मराठमोठ्या भाजी, आमटी अथवा वरणाला चव आणण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. पण, याच लसणाचा तडका सध्या चांगलाच कडला आहे. सध्या किरकोळ बाजारात लसून ७० ते ८० रुपये पाव या प्रमाणे विकला जात आहे. त्यातही दर्जाप्रमाणे किलोमागे ३५० रुपये मोजावे लागत आहेत.

गेल्या कही महिन्यांत डाळी, तांदूळ आणि गव्हाचे भाव सरासरी २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याचे बाजारपेठेत दिसून येत आहे. त्यातच दिवाळीच्या काळात टोमॅटो आणि नंतर कांद्याच्या भावाने जवळपास शंभरी गाठली होती. आता ते भाव आवाक्यात येत असताना लसणाचे भाव तीनशे रुपये किलोच्या घरात गेले आहेत. त्यामुळे सामान्य नोकरदार असलेल्या कुटुंबाचे बजेट बिघडले आहे. दरम्यान, संकरित वाणाच्या लसणाने विक्रमी भाव गाठले असताना, गावरान वाणाचा लसूण तर बाजारात किरकोळ प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचेही भाव जवळपास ४०० रुपयांच्या घरात आहेत. दरम्यान, फेब्रुवारीअखेरपर्यंत लसणाचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.

कोठून होते आवक?

राज्यात प्रामुख्याने मध्य प्रदेश व गुजरातमधून लसणाची आवक होते. देशात लसणाचे सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, ओडिशा, पंजाब, आसाम, उत्तर प्रदेशमध्ये होते. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, धुळे, नगर, जळगाव, सातारा जिल्ह्यांत लसणाचे उत्पादन घेतले जाते. पण, सध्या आवक कमी होत असल्याने भावदेखील वाढले आहेत.

“घाऊक बाजारात बुधवारी लसणाला दर्जानुसार १,४०० ते २,२०० रुपये प्रति दहा किलो असा भाव मिळाला. काही दिवसांपूर्वी हे भाव २५०० रुपयांपर्यंत होते. आपल्याकडे सध्या मध्य प्रदेशातून लसणाची आवक होत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. पुढील महिनाभर ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.” – विलास भुजबळ, ज्येष्ठ आडते, मार्केट यार्ड