पुणे – बसमध्ये लागणार तिकिट मशीन चार्जिंग पॉईंट

मार्गांत चार्जिंग उतरून बंद पडण्याच्या घटनात वा

पुणे – शेकडो किलो मीटरचा प्रवास करताना आणि प्रवाशांना तिकिटे देताना एसटी महामंडळाच्या तिकिट मशीन्सचे चार्जिंग वारंवार उतरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहकांची ऐनवेळेला फजिती होऊन जाते. यामुळे त्यावर महामंडळाने जालिम उपाय शोधला आहे. त्यानुसार सर्व बसेसमध्ये वाहकांच्या सीटच्या बाजूला चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने छपाई केलेली तिकिटे सहा वर्षांपूर्वीच बंद करून ई-तिकिट मशीन्स घेण्यात आली होती. मात्र, बहुतांशी वाहक हे सेवानिवृत्तीला आले असल्याने आणि त्यांना ही मशीन्स हाताळण्याची सवय नसल्याने वाहकांना मशीन्स हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, या मशीन्स घेऊन वाहकांना बसमधून शेकडो किलो मीटर प्रवास करावा लागतो. त्यामुळे एकदा डेपोमध्ये चार्जिंग केलेल्या मशीनचे चार्जिंग या प्रवासामध्ये टिकून राहात नाही. परिणामी प्रवाशांना तिकिटे देताना वाहकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यावर पर्याय म्हणून काही वाहक मार्गावरील बसस्थानकांवर अर्धा ते पाऊणतास थांबून या मशीन्सचे चार्जिंग करत आहेत. मात्र, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे. त्यामुळे बसमध्येच चार्जिंगचा पॉईंट काढून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यांची ही मागणी आणि गरज लक्षात घेऊन बसमध्ये हे चार्जिंग पॉईंट काढून देण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक माधव काळे यांनी दिली.

गरज भासल्यास मशीनही बदलणार…!
एसटी महामंडळाने सहा वर्षांपूर्वी या मशीन्स घेतल्या आहेत. त्यामुळे या मशीन्स हाताळताना वाहकांना त्रास होत आहे. त्याशिवाय मशीन्स मध्येच बंद पडणे, अक्षर व्यवस्थित न येणे, तिकिट अर्धवट येणे आदी प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये वादाचेही प्रकार घडले आहेत. ही बाब लक्षात घेऊन ज्या मशीन्स जुन्या आणि नादुरुस्त झाल्या आहेत. त्या गरज पडल्यास नव्या घेण्यात येतील, असेही काळे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment