Pune: उंड्री चौकात वाहतूक कोंडी

कोंढवा – मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण उंड्री चौकात दररोज तासन्‌तास जीवघेणी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलीस विभागाने याठिकाणी एकेरी वाहतूक करुन सकाळी आणि संध्यकाळच्या वेळी पोलीस संख्या वाढवावी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काँक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, महावितरणचे खांब, वीजवाहिन्यांचे अडथळे मुख्य चाैकातील अतिक्रमणे, अवैध पार्कींग असे अडथळे दूर करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येइल, असा इशारा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले यांनी दिला आहे.

मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. उंड्रीचौकात तर दिवसभर वाहतूक कोंडी असते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी खूपच अपुरे वाहतूक पोलीस कर्मचारी असतात, त्यामुळे हा रस्ता, वाहतूक कोंडीचा आणि अपघातील ठरत आहे.

मंतरवाडी-पिसोळी दरम्यानच्या बाह्यवळण रस्त्यावर अनेक ठिकाणी थेट उतार आणि वळण, सूचनाफलकांचा अभाव आहे. यामुळे वाहन चालकांचा गोंधळ उडून अपघात होत असल्याने संबंधित विभागाने रस्त्याचे रुंदीकरण करून गावांच्या ठिकाणी लावलेले सिग्नल सुरू करावेत, तसेच योग्य ते सूचना फलक लावणेही गरजेचे आहे.

शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सोलापूर, सासवडमार्गे मुंबईकडे जाणारी तसेच येणारी वाहने कात्रज-मंतरवाडी बायपासमार्गे वळविली आहेत. मात्र, बायपास रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण रखडले आहे, गेली कित्येक वर्षे हे काम रखडले आहे. यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या गर्दीमुळे ध्वनी तसेच वायू प्रदूषणाचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या मार्गावर तातडीने उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले, प्रविण आबनावे, विठ्ठल होले यांनी दिला आहे.