संसेदतला कलगीतुरा बारामतीत रंगणार; खासदार सुळेंच्या मतदारासंघात “अर्थमंत्री’ मुक्कामी

पुणे (बारामती)  – महागाई आणि केंद्राशासनाच्या धोरणा विरोधात संसदेत बारामतीच्या खासदार सुप्रीया सुळे आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यात शाब्दीक चकमक उडते. मात्र, हा संसदेत रंगणारा कलगीतुरा आता थेट बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात रंगणार असून भाजपकडून बारामतीच्या बालेकिल्लयात पवारांना आव्हान देण्यासाठी थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनाच उतरविण्यात आले आहे.

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 16 ,17 व18 ऑगस्ट रोजी बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार असून दिनांक 17 रोजी त्यांचा बारामतीत मुक्काम असल्याची माहिती भाजपाचे पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने देशातील काही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्या अनुषंगाने निर्मला सीतारामन बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा बारामती दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दि( 16 )रोजी मतदार संघातील खडकवासला, भोर दि( 17 )रोजी इंदापूर, दौंड तर दि( 18) रोजी बारामती, पुरंदर विधानसभा मतदारसंघात त्या भेट देणार आहेत. त्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.

मतदार संघातील धार्मिक स्थळे तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटी घेणार आहेत. तसेच केंद्रीय प्रकल्पांना देखील त्या भेटी देणार आहेत. तर निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माझी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे देखील 9 ऑगस्ट रोजी बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याविषयीचा आढावा ते घेणार आहेत. त्यांच्या समवेत आमदार राम शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, वासुदेव काळे, जालिंदर कामटे, भीमराव तापकीर, शरद ढमाले, बाळासाहेब गावडे आदी उपस्थित राहणार आहेत.