पुणे विद्यापीठातील प्रवेश अर्ज प्रक्रिया शनिवारपासून (दि.२०) सुरु

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संकुलातील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्या शाखीय अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यापीठातील पदवी व पदव्‍युत्तरच्‍या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्‍या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास उद्यापासून (दि.२०) सुरु होत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १० मेपर्यंत आहे.

याबाबतचे वेळापत्रक विद्यापीठाने शुक्रवारी प्रसिद्ध केले. त्‍यानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी २० दिवसांची मुदत आहे. पदवी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा १३ जून रोजी, तर पदव्‍युत्तरसाठी परीक्षा १४ ते १६ जून या दरम्‍यान होण्याची शक्‍यता आहे.

विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर त्याची प्रवेश परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर गुणवत्तेनुसार प्रत्यक्ष प्रवेश दिले जाते. विद्यापीठात प्रवेश मिळणे, हे बहुतांश विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. त्यादृष्टीने विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज करतात. प्रवेश परीक्षा १०० गुणांची असून, त्‍यासाठी दोन तासांचा अवधी आहे. प्रवेश परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सविस्‍तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.