PUNE: आम्ही पाण्याचे नियोजनच केलेले नाही!

पुणे – गेल्या चार महिन्यांत जलसंपदा विभागाने महापालिकेस तीन ते चार वेळा पत्र पाठवून पाणीकपात करण्यासह बचतीबाबत पत्र दिले आहे. मात्र, धरणात शिल्लक पाण्याचे शेतीसाठीचे आवर्तन तसेच बाष्पीभवन गृहीत धरून महापालिकेस नेमके किती पाणी दिले जाईल, याचे कोणतेही नियोजन जलसंपदा विभागाकडे नसल्याचे समोर आले आहे.

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत तीन टीएमसी कमी पाणी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीवापर काटकसरीने करण्यासाठी पालिकेने जलसंपदा विभागाकडे नियोजनाची मागणी केली होती. मात्र, कोणतेही नियोजन केले नसल्याचे जलसंपदाने तोंडी कळवले आहे. त्यामुळे अनागोंदी कारभार पुन्हा समोर आला आहे.

खडकवासला धरणसाखळीत चार प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठवण क्षमता २९.५० टीएमसी आहे. यातून सुमारे १७ ते १८ टीएमसी पाणी शहरासाठी दिले जाते. तर उर्वरित पाणी जिल्ह्यातील सिंचन योजनेसाठी दिले जाते. यावर्षी पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटल्याने धरणात गतवर्षीच्या तुलनेत तीन टीएमसी कमी पाणी आहे. त्यामुळे उर्वरित पाणीसाठा उन्हाळ्यात कमी पडण्याची शक्यता आहे. त्यावर पावसाळा संपल्यापासून जलसंपदा विभाग महापालिकेस पत्र पाठवत असून, पाणीबचत तसेच कपात करण्याची मागणी करण्यात येत आहे.

महापालिकेने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत खडकवासला धरणातून उचलण्यात येणारे पाणी कमी केले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गळती शोधली जात असून त्याद्वारेही पाणी बचत केली जात आहे. मात्र, त्याच वेळी जलसंपदा विभागाकडून शेतीसाठीची आवर्तने आणि इतर बाबींचे प्राथमिक नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी महापालिकेकडूनच नियोजनाची अपेक्षा केली जात आहे.

कालवा समितीची लवकरच बैठक

धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे उन्हाळ्यातील वाटप निश्चित करण्यासाठी फेब्रुवारीत कालवा समितीची बैठक घेण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी केले होते. पावसाळा संपल्यानंतर नियोजनाची बैठक झाली असली, तरी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन धरणांत पुरेसा साठा असल्याचे सांगत ग्रामीण आणि शहरी भागाला न दुखावता दोन्हीसाठी पाणी दिले जात आहे. मात्र, आता साठा लक्षणीय घटल्याने पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे कालवा समितीची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.