पुणे : काम कोणी करायचे? क्षेत्रीय कार्यालय-पालिका प्रशासनात वाद

दत्तनगर-आंबेगाव रस्त्यावर चेंबर पुन्हा फुटले

आंबेगाव बुद्रुक – आंबेगाव बुद्रुक येथील दत्तनगर-आंबेगाव रस्त्यावर मैला-सांडपाणी सातत्याने वाहत आहे. हा रस्ता रहदारीचा असल्याने वाहनांच्या वर्दळीतून दुर्गंधयुक्त पाणी सर्वत्र उडत असल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. त्यातच क्षेत्रीय कार्यालयाने काम करायचे की पालिकेच्या मुख्य खात्याने, यातून प्रशासनाकडून कामाऐवजी नवीन हद्द, जुनी हद्द, असा वाद घातला जात आहे. नगरसेवकांचेही पालिकेच्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण नसल्यामुळे येथील समस्या वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दत्तनगर चौक ते आंबेगाव रस्ता याठिकाणी गेल्याच महिन्यात ड्रेनेजलाइनचे चेंबर फुटले होते. महानगरपालिकेकडून येथे तात्पुरती डागडुजी करण्यात आली. आता, पुन्हा तेच चेंबर फुटल्याने मैला-सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. या बाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु, प्रशासनाकडून कार्यवाही होत नाही. रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर ड्रेनेज लाइनची दुरुस्ती करून रस्त्यावरून वाहणारे मैला-सांडपाणी थांबवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

नागरिकांच्या अरोग्याशी निगडित असलेल्या प्रश्‍नाकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही गांभीर्याने पाहात नसल्याचे उघड आहे. अन्यथा, हे काम तातडीने झाले असते. नागरिकांच्या करातून मानधन आणि पगार मिळतो, हे लक्षात ठेवा. संबंधितांनी याकामी तातडीने लक्ष देऊन हा प्रश्‍नी मार्गी लावावा.
– शंकरराव बेलदरे पाटील, माजी नगरसेवक, पुणे मनपा

Leave a Comment