पुणे | पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला हक्काचे व्यासपीठ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेला पुणे शहराच्या सांस्कृतिक वारशाला हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. महापालिकेकडून पहिल्यांदाच शहरासाठी सांस्कृतिक धोरण तयार केले जाणार असून, त्यासाठी २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात ३ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

या निधीतून केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न करता शहराचा ऐतिहासिक वारसा, कला, संस्कृती, लोप पावत असलेल्या कला, कलाकारांसाठी हक्काचे व्यावसापीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाकडे याची जबाबदारी असणार आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे धोरण केले जाणार असून पुढील वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

महापालिकेकडून शहरात नाट्यगृहे, कलादालने बांधण्यात आली आहे. सांस्कृतिक क्षेत्रासाठी या मिळकती मोलाच्या ठरत असल्या, तरी शहराचा सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी महापालिकेकडून केवळ “हेरिटेज’ इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती या व्यक्तिरिक्त काहीच केले जात नाही.

त्यामुळे हा सांस्कृतिक वारसा टिकविण्यासाठी शहराची ओळख असलेल्या कला, कलाकार, त्यांच्या कलाकृती, जुन्या पुण्याचे अस्तित्त्व टिकवून असलेल्या कला यासह नृत्य, नाटक, वेगवेगळया नृत्य शैली, साहित्य कलाकृती या सर्वांसाठी एकच व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

त्या माध्यमातून शहरात “सांस्कृतिक पर्यटन’ ही नवी संकल्पना रुजवली जाणार आहे. यासाठी हे सांस्कृतिक धोरण तयार केले ज़ाणार असून, त्यासाठी अंदाजपत्रकात आयुक्तांक़डूनही तीन कोटींचा निधी प्रस्तावित करत या धोरणाला चालना दिली आहे. त्यामुळे पुण्याची ओळख पुन्हा नव्याने जागतिक पटलावर पोहचविण्यासाठी या धोरणाची मदत होणार आहे. पहिल्यांच सांस्कृतिक महोत्सवाच्या पुढे जाऊन महापालिकेकडून सांस्कृतिक क्षेत्रासाठी विशेष काम केले जाणार आहे.