‘Punishment’ Video : गाऱ्हाणं घेऊन येणाऱ्या व्यक्तीला अधिकाऱ्याने दिली कोंबडा बनण्याची शिक्षा; व्हिडिओ व्हायरल

‘Punishment’ Videoउत्तर प्रदेशातील बरेली येथील एका सरकारी अधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयात एका व्यक्तीला कथितपणे ‘शिक्षा’ देणे चांगलेच महागात पडले आहे. या शिक्षेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला त्याच्या पदावरून कमी करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

बरेली जिल्ह्यातील मीरगंज शहराचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) उदित पवार (Udit Pawar)  यांच्यावर स्मशानभूमीची जागा मिळावी अशी विनंती करणाऱ्या एका व्यक्तीला ‘कोंबडा’  बनण्याचा आदेश दिल्याचा आरोप आहे. या व्यक्तीने पवार (Udit Pawar)  यांची याच प्रकरणात तिसऱ्यांदा भेट घेतल्याच्या रागातून त्यांनी ही शिक्षा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दंडाधिकारी उदित पवार (Udit Pawar) यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. याविषयी बोलताना, पवार यांनी,” आपण कार्यालयात प्रवेश करण्याच्या अगोदरपासूनच त्याच अवस्थेत उभा होता. तसेच आपण इतर अधिकाऱ्यांना त्यांना मदत करण्याची विनंती देखील केली असल्याचे म्हटले आहे.

तर दुसरीकडे स्मशानभूमीशी संबंधित मागणी घेऊन तो त्याच्या गावातील इतर काही लोकांसह एसडीएम कार्यालयात पोहोचला, परंतु एसडीएमने त्याऐवजी त्याला शिक्षा केली आणि त्याचे पत्र फेकून दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे.

तथापि, जिल्हा दंडाधिकारी म्हणाले की, प्राथमिक चौकशीत एसडीएमची चूक असल्याचे समोर आले आहे. त्यांनी पवार (Udit Pawar)  यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे, आणि त्यांना आतापर्यंत नवीन पद नियुक्त केलेले नाही.