पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना ठणकावले; म्हणाले,”तुम्ही काम बंद करूनच दाखवा”

नवी दिल्ली : पंजाबमधील पटवारी व प्रशासनातील इतर असे २ हजाराहून जास्त कर्मचारी वेतन व इतर प्रमुख मागण्यांसाठी संप करण्याचा विचार करत आहेत. त्यातच आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या संपावर जाण्याचा इशारा देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच ठणकावले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना “तुम्ही काम बंद करून तर दाखवा” असा थेट इशाराच  दिला आहे.

पंजाबमधील पटवारी व प्रशासनातील इतर असे २ हजाराहून जास्त कर्मचारी वेतन व इतर प्रमुख मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला आहे. यामुळे पंजाबमधील सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

भगवंत मान यांनी कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत “आता खूप झालं. तुम्हाला महिन्याला जवळपास दीड लाख रुपये पगारादाखल मिळत आहेत. तरीही तुम्ही रोज उठून कामबंद आंदोलनाची धमकी देत आहात. जर तुमच्या मागण्या रास्त आहेत, तर त्या आमच्यापर्यंत यायला हव्यात. कदाचित या कर्मचाऱ्यांना वाटत असेल की कामबंद करून ते जनतेला मनस्ताप देतील व त्यामुळे माझ्या प्रतिमेला तडा जाईल. पण असं असेल, तर मग हा बंद संपल्यानंतर मी त्यांना कामावरून का काढू नये? मी त्यांना आव्हान देतो, त्यांनी काम बंद करूनच दाखवावं”, असे भगवंत मान यांनी म्हटले आहे.

संग्रूरमध्ये महसूल विभागातील दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मात्र, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उलट २०३७ नव्या पदभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तसेच, कामबंद आंदोलनाचा इशारा दिलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी बायोमेट्रिक हजेरी प्रक्रियाही सक्तीची केली आहे.

त्यासोबतच “आपल्याकडे राज्यात असंख्य बेरोजगार तरुण असे आहेत जे तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले आणि काम करण्यास तयार आहेत. काहींना कदाचित वाटत असेल की मी नवखा आहे. पण मला सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अनुभव आहे. माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. त्यामुळे जनतेला त्रास देण्याच्या या प्रकारात कोण गुंतलं आहे याची मला पूर्ण माहिती आहे”, अशा शब्दांत भगवंत मान यांनी कामबंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.