अमेरिकेत नर्सला 760 वर्षांच्या कैदेची शिक्षा; 17 रुग्णांची केली हत्या

न्यूयॉर्क – अमेरिकेत एका परिचारिकेला अर्थात नर्सला तेथील न्यायालयाने ७६० वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. १७ रूग्णांची हत्या आणि अन्य अनेक जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात तिला दोषी ठरवण्यात आले आहे. हिदर प्रेसडी (वय ४१) असे तिचे नाव असून २०२० ते २०२३ या तीन वर्षांत पाच वेगवेगळ्या नर्सिंग होममध्ये काम करत असताना तिने हे गुन्हे केले असल्याचे सिध्द झाले आहे.

२२ रूग्णांना गरजेपेक्षा जास्त प्रमाणात इन्सुलिन दिल्याचाही प्रेसडीवर आरोप होता. रात्रपाळीवर काम करत असताना तिने अनेक रूग्णांना मधुमेहाचा आजार नसतानाही इन्सुलिन दिल्याचा आरोप तिच्यावर होता.

इन्सुलिनची आवश्‍यकता नसतानाही ते दिले गेल्यामुळे यातील काही रूग्णांचा तत्काळ मृत्यू झाला तर काहींचा नंतर मृत्यू झाला. मरण पावलेले रूग्ण ४३ ते १०४ या वयोगटातील होते. इन्सुलिनच्या अधिक मात्रेमुळे हायपोलग्लायसिमीया होऊ शकतो. त्यामुळे हृदयाची धडधड वाढते आणि हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.

हिदर प्रेसडीवर गेल्या वर्षी मे महिन्यात दोन रूग्णांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणाच्या तपासात तिचे इतर गुन्हे उघड झाले आहेत. हिदरसोबत काम करणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांनी सांगितले की ती रूग्णांचा तिरस्कार करायची. ती सतत त्या रूग्णांबद्दल आक्षेपार्ह विधाने करत असायची.

गुन्हा केला मान्य –
हिदरने तिच्या आईलाही एक टेक्स्ट मेसेज केला होता. त्यात तिने रूग्ण, सहकारी आणि रेस्टॉरंटमध्ये भेटलेल्या लोकांबद्दल नापसंती व्यक्त केली होती. न्यायालयात एका वकिलाने तिला विचारणा केली की ती स्वत:ला दोषी का मानते आहे यावर उत्तर देताना ती म्हणाली मी दोषी असल्यामुळेच स्वत:ला दोषी मानते आहे. न्यायालयात समोर आलेल्या माहितीनुसार २०१८ ते २०२३ या काळात हिथर प्रेसडीने अनेक नर्सिंग होममध्ये काम केले होते. तिचे निलंबन करण्यात आल्यानंतर लायसन्सही स्थगित करण्यात आले होते.