राफेल हा जगातील सर्वांत मोठा घोटाळा – पृथ्वीराज चव्हाण

पुणे – “लोकसभा निवडणुकीच्या मध्यावर आपण आहोत. काही कारणांमुळे निवडणुका होतील का अशी साशंकता ही आमच्या मनात होती. पंतप्रधान मोदी व्यक्तीगत टीका करत आहेत, पण त्यांनी केवळ मुद्द्यांवर बोलले पाहिजे. मोदी यांनी पाच वर्षांमध्ये काय केले याचा उल्लेख केला जात नाही. त्यांच्या भाषणातून विकास हा शब्दच गायब झाला आहे. राफेल घोटाळा हा जगाच्या पाठीवरचा सर्वांत मोठा घोटाळा आहे. तो मोदींच्या सहीने झाला आहे,’ अशी टीका कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. “खोटीच्या खोटी उड्डाणे’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

लेखक रवी नायर यांच्या “फ्लायिंग लाईज – राफेल इंडियाज बिगेस्ट डिफेन्स स्कॅंडल’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद अवधूत डोंगरे यांनी केला आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार परंजोय गुहा ठाकूरता, कॉम्रेड अजित अभ्यंकर, सुरेश जोंधळे आदी उपस्थित होते.

“कॅबिनेटला न विचारता राफेलच्या पुर्नकराराचा निर्णय मोदींनी गुप्तपणे घेतला. याचपद्धतीने नोटाबंदीचा निर्णयही मोदींनी घेतला होता. जशी माहिती समोर येत गेली, तेव्हा लक्षात आले की हा फुगा होता, ज्या फुग्यातील हवा हळूहळू बाहेर येत आहे,’ असे अजित अभ्यंकर म्हणाले.

“चौकीदार म्हटले, की चोर लक्षात येते आणि ते आले की राफेल प्रकरण समोर येते. ही निवडणूक वैयक्तिक मोदींचा पराजय करण्याचीही आहे. त्यांनी हुकूमशहाप्रमाणे सगळे स्वतःच्या हातात ठेवले आहे. जगाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याला मतपेटीतून जाब विचारला पाहिजे,” असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

Leave a Comment