2024च्या निवडणुकीसाठी काॅंग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरला

हैदराबाद – कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मंगळवारी येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. यात्रेदरम्यान झालेल्या सभेत बोलताना त्यांनी सूचक वक्तव्य केले. कॉंग्रेस देशाला पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील बिगरभाजप सरकार देईल, असे त्यांनी म्हटले. त्यातून कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल हेच असतील, असा अप्रत्यक्ष संदेश खर्गे यांनी दिल्याचे स्पष्ट होत आहे.

देशातील बहुतांश कॉंग्रेसजनांची इच्छा असतानाही राहुल यांनी पक्षाचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्याचे टाळले. त्यांच्या नकारामुळे कॉंग्रेसला गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडणे भाग पडले. खर्गे अध्यक्ष बनल्याने राहुल यांची पक्षात भूमिका काय असणार, हा प्रश्‍न सातत्याने पुढे येऊ लागला. पत्रकारांनीही वारंवार थेट राहुल यांच्याकडूनच त्या प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण, राहुल यांनी त्यांची भूमिका गुलदस्त्यातच ठेवली.

खर्गे कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. तेच माझी भूमिका ठरवतील, असे म्हणत राहुल यांनी त्यांच्या विषयी तर्क-वितर्क सुरूच राहतील अशी योजना केली. पण, आता खर्गे यांनी कॉंग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यास राहुल कुठल्या भूमिकेत असतील याचे आडवळणाने सूतोवाच करून टाकले आहे. खर्गे यांनी राहुल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचीही मुक्तकंठाने प्रशंसा केली. यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

जनता लाखोंच्या संख्येने यात्रेत सहभागी होत आहे. देशात 2024 या वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. त्यातून आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला यश मिळाल्यास त्याचे श्रेय राहुल यांच्या यात्रेला असेल, असे संकेत खर्गे यांनी दिल्याचे मानले जात आहे.