राहुल गांधींची यात्रा म्हणजे केवळ फोटो काढण्यासाठी करण्यात आलेला दिखावा – ममता बॅनर्जी

कोलकता  – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कॉंग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. त्यांनी कॉंग्रेसला हिंदीभाषिक राज्यांत भाजपविरोधात लढण्याचे आव्हान दिले. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला अवघ्या ४० जागा जिंकता येण्याविषयीही साशंकता व्यक्त केली.

बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस स्वबळावर लढेल, अशी घोषणा ममतांनी काही दिवसांपूर्वी केली. ती घडामोड इंडिया या विरोधी पक्षांच्या देशव्यापी आघाडीसाठी जोर का झटका ठरली. त्यानंतर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडल्याचा ठपका तृणमूलकडून सातत्याने कॉंग्रेसवर ठेवला जात आहे. आता त्याही पुढे जात ममतांनी कॉंग्रेसवरील टीकेची धार आणखी तीव्र केली आहे.

आम्ही (तृणमूल) बंगालमध्ये हातमिळवणीची तयारी दर्शवली होती. त्यासाठी कॉंग्रेसने २ जागा लढवाव्यात असा प्रस्तावही दिला. मात्र, तो प्रस्ताव फेटाळणाऱ्या कॉंग्रेसने आता बंगालमधील लोकसभेच्या सर्व ४२ जागा लढवाव्यात. आमच्यात सध्या कुठलाही संवाद होत नाही, असे त्यांनी म्हटले.

ममतांनी बंगालमध्ये पोहचलेल्या कॉंग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवरही निशाणा साधला. यात्रेविषयी कॉंग्रेसकडून मला काहीच कळवण्यात आले नाही. त्याविषयीची माहिती मला प्रशासकीय सुत्रांकडून मिळाली. यात्रेला परवानगी देण्याची विनंती करण्यासाठी कॉंग्रेसने तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांच्याशी संपर्क साधला, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

कॉंग्रेसच्या यात्रेची तुलना ममतांनी स्थलांतरित पक्ष्यांशी केली. तसेच, यात्रा म्हणजे केवळ फोटो काढण्यासाठी करण्यात आलेला दिखावा असल्याचे म्हटले. एकीकडे कॉंग्रेसकडून ममतांची समजूत काढण्याविषयी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, दुसरीकडे त्या कॉंग्रेसविषयी आक्रमक मूडमध्ये दिसत आहेत.