भिगवण येथे रेल रोको आंदोलन

भिगवण (पुणे जिल्हा) – भिगवण येथे हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एक्सप्रेस, कन्याकुमारी व बंगळूर एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचा थांबा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी दि.२७ रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळापासून या रेल्वे गाड्यांचा थांबा भिगवण स्टेशन येथून बंद करण्यात आला होता परंतु तदनंतर सदरचा थांबा पूर्ववत होण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी निवेदने देऊन हा थांबा पूर्ववत करण्याची मागणी केली होती. परंतु रेल्वे प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येथील नागरिक, प्रवासी, विद्यार्थी यांच्या प्रवासाची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली होती.

भिगवन हे ठिकाण पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांचे केंद्रबिंदू असून या ठिकाणाहून दौंड, पुणे, मुंबई, सोलापूर व इतरत्र रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे या ठिकाणी उपरोक्त रेल्वे गाड्यांचा थांबा असणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु रेल्वे प्रशासनाकडून या मागणीची कोणतीही दखल न घेतल्यामुळे रेल रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने भिगवन व परिसरातील नागरिकांनी आंदोलनासाठी उपस्थिती दर्शवली रेल्वे प्रशासन व भिगवन पोलीस प्रशासनाकडून आंदोलन स्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे रेल्वे थांबा पूर्ववत न झाल्यास भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला.

“भिगवन व परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने रेल्वे रोको आंदोलन यशस्वी झाले नागरिकांची,प्रवाशांची, विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे थांबा पूर्ववत होण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासनालाही वारंवार रेल्वे थांबा पूर्ववत सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला होता परंतु रेल्वे प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे आंदोलनाची वेळ आली. यामुळे रेल्वे थांबा पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे”.

– दिपीका क्षीरसागर,सरपंच भिगवन,  मुमताज शेख, उपसरपंच

आंदोलनाला श्रेयवादाची किनार-
रेल्वे रोको आंदोलनाच्या वेळी झालेली गर्दी पाहून राजकीय पुढाऱ्यांनी श्रेय घेण्यासाठी सदरचे आंदोलन स्वतः करीत असल्याचा अविर्भाव आणत राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला परंतु सदरचे रेल्वे रोको आंदोलन त्या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांमुळे यशस्वी झाले असून त्याचे श्रेय कोणीही घेण्याचा प्रयत्न करू नये असे येथील ग्रामस्थ किरण कांबळे यांनी सांगितले.