#IPL2020 : राजस्थानने हैदराबादला 158 धावांवर रोखले

दुबई – मनीष पांडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने  राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान ठेवले आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नर याने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर हैदराबादने 20 षटकांत 4 बाद 158 धावसंख्यपर्यंत मजल मारली.


हैदराबादची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या 23 असताना कार्तिक त्यागीने जाॅनी बेअरस्टोला संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. जाॅनी बेअरस्टो 16(19) धावांवर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वाॅर्नर आणि मनीष पांडे यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 73 धावा जोडल्या. जोफ्रा आर्चरने डेव्हिड वाॅर्नरला त्रिफळाचित करत हैदराबादला दुसरा धक्का दिला. वाॅर्नरने 38 चेंडूत (3 चौकार व 2 षटकार) 48 धावा केल्या.

त्यानंतर मनीष पांडेने आपले अर्धशतक पूर्ण केलं. तसेच त्याने आयपीएल स्पर्धेतील आपल्या 3000 धावादेखील पूर्ण केल्या. मनीष पांडेला जयदेव अनादकटने राहुल तेवतियाकरवी झेलबाद करत हैदराबादला तिसरा धक्का दिला.

मनीष पांडेने 44 चेंडूत (2 चौकार व 3 षटकार)  सर्वाधिक 54 धावा केल्या. त्यानंतर केन विलियमसनने 12 चेंडूत ( 2 षटकार) नाबाद 22 आणि प्रियम गर्गने 8 चेंडूत ( 1 चौकार व 1 षटकार) 15 धावा करत संघाची धावसंख्या 20 षटकांत 158 पर्यंत नेली.

राजस्थानकडून जोफ्रा आर्चर (4 षटकात 25 धावा), कार्तिक त्यागी (3 षटकात 29 धावा) आणि जयदेव उनादकट (4 षटकात 31 धावा) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. श्रेयस गोपलने 4 षटकात 31 तर राहुल तेवतियाने 4 षटकात 35 धावा दिल्या.

Leave a Comment