भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाण अन् मिलिंद देवरांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

Rajyasabha Election । राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या अशोक चव्हाण आणि मिलींद देवरा यांना आनंदाची बातमी मिळालीय. काँग्रेसमधून भाजपात गेलेले अशोक चव्हाण आणि शिंदे गटात गेलेले मिलिंद देवरा यांच्यासह सहा उमेदवार मंगळवारी राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले.

राज्यातील सर्व विजयी उमेदवारांमध्ये भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे, शिंदे सेनेचे देवरा, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश आहे. २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असली तरी इतर कोणीही दावेदार नसल्याने या नेत्यांना विजयी घोषित करण्यात आले.

मिलिंद देवरा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार Rajyasabha Election ।

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  मिलिंद देवरा  यांनी आभार मानले आहेत. याविषयी बोलताना देवरा म्हणाले, “राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या नेत्यांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व समर्पित कार्यकर्त्यांचे आभार. मी संसदेत मुंबई, महाराष्ट्र आणि भारताच्या विकासासाठी काम करण्यास उत्सुक आहे.”

पीठासीन अधिकाऱ्यांनी मिलिंद देवरा यांना संसदेच्या वरच्या सभागृहातील जागेसाठी विजयी घोषित करणारे प्रमाणपत्रही दिले. गेल्या महिन्यात, माजी केंद्रीय राज्यमंत्री देवरा यांनी आपल्या नऊ नगरसेवक आणि ४५० समर्थकांसह शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेत प्रवेश केला होता. भाजपाकडून डॉ. मेधा कुलकर्णी यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांनाही काल नियुक्तीपत्र देण्यात आले. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली.

 १६ राज्यांमधील ५६ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका Rajyasabha Election ।

गेल्या महिन्यात, केंद्रीय निवडणूक आयोगाने २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सहा मतदारसंघांसह १६ राज्यांमधील ५६ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या होत्या. नामांकन प्रक्रिया ८ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती, तर नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी होती. दुसऱ्या दिवशी अर्जांची छाननी झाली. २० फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.