satara | रकुल कार्तिकेय शनिवारी राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश करणार

सातारा, (प्रतिनिधी) – कोणत्याही जाती धर्माला थारां न देणाऱ्या राष्ट्रवादी पवार गट पक्षामध्ये येत्या ४ मे रोजी आपण प्रवेश करत आहोत. पक्ष माझ्यावर जी जबाबदारी दिली ती स्वीकारून ती जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी माहिती स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रकुल कार्तिकेय पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना पुढे म्हणाले, यापूर्वी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांमध्ये होतो त्यावेळी केलेली आंदोलने ही सातारा जिल्ह्यामध्ये दिशादर्शक ठरली. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही माध्यमात आपण हिरीरेने काम केले आहे.

वाई व पाटण या दोन तालुक्यात सव्वा लाखांपेक्षा अधिक मोतीबिंदूची ऑपरेशन शिबिरे राबवून समाजातील गोरगरिबांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न यशस्वी झाला आहे. मधल्या काळात काही व्यक्तिगत अडचणीमुळे राजकीय आणि सामाजिक प्रवाहापासून मी दूर होतो. मात्र माझा अध्यात्मिक प्रवास आता सातत्याने कायम असून मी महादेवाची उपासना करत आहे.

सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सूक्ष्म लघु कर्ज क्षेत्रामध्ये वित्तीय कंपन्या गरजू माता भगिनींना विशिष्ट व्याजदराने कर्ज देऊन त्यांना सहाय्य करतात. मात्र व्याजदराच्या मुद्द्यावर त्यांना फसवले जाते. व्याजदराची टक्केवारी वाढवण्यात येऊन गरजू महिलांचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे त्या आर्थिक दृष्ट चक्रामध्ये अडकत जातात.

त्यामुळे स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील माता-भगिनींना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील. कोणत्याही जाती धर्माला थारा न देणारा राष्ट्रवादी पवार गट पक्षांमध्ये मी येत्या चार मे रोजी हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत प्रवेश करणार आहे .

मी एक शिवभक्त असून शिवप्रेरणेच्या विचारांचा एक सच्चा मावळा आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याचे प्रश्न घेऊनच मी पुन्हा समाजकारणात प्रवेश करतो आहे. मायक्रो फायनान्स चळवळीच्या संबंधात खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शरदचंद्र पवार गटामध्ये जाती-धर्मांना प्राधान्य देणारे आता त्या गटापासून दूर गेले आहेत. त्यामुळे हाच एक पक्ष सर्वधर्म विचारांना प्राधान्य देतो म्हणून या पक्षात मी प्रवेश करत आहे व पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल असे रकुल कार्तिकीय पार्वती महादेव यांनी सांगितले.