Ram Mandir Ayodhya: TATA आणि L&T कंपनी उभारतेय भव्य राम मंदिर

Ram Mandir Ayodhya – अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी 30 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या येथून अमृत भारत एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या भव्य कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत. या कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अयोध्येचे हे भव्य राम मंदिर देशातील 150 वर्ष जुना टाटा समूह आणि आघाडीची बांधकाम कंपनी L&T यांनी संयुक्तपणे बांधले आहे.

टाटा समूहाने अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र मंदिराच्या उभारणीसाठी पूर्ण योगदान दिले आहे. टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स कंपनीने या मंदिराच्या बांधकामात व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले आहे. तर, L&T ने या प्रतिष्ठित प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारी घेतली आहे.

दरम्यान, टाटा समूहाने अलीकडेच नवीन संसद भवन बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समूहाच्या टाटा प्रोजेक्ट्स आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्सनी हे मोठे प्रकल्प अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केले. विशेष म्हणजे, संसदेचा बांधकाम प्रकल्प टाटा प्रोजेक्ट्सने सप्टेंबर 2020 मध्ये L&T चा पराभव करून जिंकला होता. यासाठी कंपनीने 861.90 कोटी रुपयांची बोली लावली होती, तर L&T ने 865 कोटी रुपयांची बोली लावली होती. नवीन संसदेच्या उद्घाटनानंतर, कंपनीला ENR चा ग्लोबल बेस्ट प्रोजेक्ट्स पुरस्कार देखील मिळाला.

टाटा प्रोजेक्ट्सने आतापर्यंत देशात मोठे 30 प्रकल्प पूर्ण केले आहेत. संसदेशिवाय नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही यामध्ये समावेश आहे. याशिवाय कंपनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, पुणे मेट्रो आणि मुंबई मेट्रोसारख्या प्रकल्पांवरही काम करत आहे.