“भाजपसाठी राम मंदिर मुद्दा उपयुक्त ठरेना” – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई -लोकसभा निवडणुकीत राम मंदिर मुद्दा भाजपसाठी उपयुक्त ठरत नसल्याचं दिसतयं, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपपुढे आव्हान उभे केले असल्याचे भाष्यही त्यांनी केले.

सुरक्षा दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर एअरस्टाइक केला. त्याचा लाभ २०१९ यावर्षीच्या निवडणुकीत भाजपला झाला. त्या पक्षाच्या मतांमध्ये ७ टक्के वाढ झाली. तशाच प्रकारे आताच्या निवडणुकीत राम मंदिरामुळे मतांची उसळी लाभेल अशी भाजपची अपेक्षा होती.

मात्र, तसे घडताना दिसत नाही. तो मुद्दा भाजपसाठी लाभदायी ठरत असल्याचे वाटत नाही, असे निरीक्षण चव्हाण यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी मांडले. भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांनी पाऊले उचलली.

त्यातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले. अर्थात, काही पक्ष समवेत न आल्याने प्रारंभी वाटले तेवढी इंडिया आघाडी मजबूत बनू शकली नाही. तसे असले तरी भाजपपुढे ठोस आव्हान उभे करण्यात आघाडी यशस्वी ठरली आहे, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.

प्रामुख्याने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा निकाल सर्वांनाच चकित करणारा असेल. राज्यातील सत्तारूढ महायुतीपेक्षा अधिक जागा आमची महाविकास आघाडी जिंकेल, असा दावा चव्हाण यांनी केला. वाढती महागाई, बेरोजगारीमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे.

त्यामुळे ते निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे ठरणार आहेत. शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हाही आणखी एक प्रमुख मुद्दा आहे. महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार पाडण्यात आले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांमध्ये फूट पाडण्यात आली.

त्या घटनांमुळे राज्यातील जनतेचा भाजपवर रोष आहे. शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांनंतर कॉंग्रेसमध्येही फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. मात्र, ते यशस्वी ठरले नाहीत. काही नेते कॉंग्रेस सोडून गेले. पण, पक्ष एकजूट राहिला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.