आगामी लोकसभा निवडणूक शिर्डी मतदारसंघातून लढणार – रामदास आठवले

नगर – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणूक शिर्डी मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा केली आहे. मंत्री आठवले गुरुवारी नगर जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

आठवले म्हणाले, की शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. यावेेळी निवडणूक जिंकणारच आहे. संधी मिळाल्यास संधीचे सोने करू. जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच भाजप व शिंदे गटाची मागणी असेल, मी निवडून येण्याचे वातावरण असेल तर मी तेथून निवडणूक लढणार आहे. भाजप व मित्रपक्षाने मला आग्रह केला तर मी निश्चित शिर्डीतून निवडणूक लढेल. फक्त शिर्डीच नाही तर नगर जिल्ह्याच्या विकासासाठीही त्याचा फायदाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगर आणि शिर्डीच्या विकासाच्या दृष्टीने या परिसरात एखादा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील. येथे रस्ते चांगले आहेत. मात्र, काही ठिकाणी रस्ते खराब आहेत. त्यामुळे रस्ते सुधारण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, विरोधकांकडून आधिवेशनादरम्यान पन्नास खोके आता सगळं ओके अशा घोषणा देत सरकारवर टीका केली जात आहे. यावर आठवले म्हणाले, की ते म्हणतात 50 खोके बाकी सगळं ओके.. मी म्हणतो आता मारा छक्के. त्यामुळे कितीही घोषणा देत असले तरी त्यात काही तथ्य नाही. सध्या ईडीच्या कारवाया वाढल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. मात्र त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही. ईडीची चौैकशी आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे विरोधकांचा हा आरोप खोटा आहे.

सरकार टिकणार पुन्हा निवडून येणार

शिंदे-फडणवीस सरकार फार काळ टिकणार नाही असे विरोधक सातत्याने म्हणत आहेत. मात्र, त्यात काही तथ्य नाही. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. शिंदे गटाकडे 40 आमदार आणि 12 खासदार आहेत. त्यामुळे त्यांचीच खरी शिवसेना आहे. इतकेच नाही तर पुढील निवडणुकीत राज्यात महायुती तर केंद्रात एनडीएचे पूर्ण बहुमताचे सरकार येणार आहे. या निवडणुकीत एनडीएला देशभरात 400 ते 450 जागा मिळतील, असेही त्यांनी सांगितले.

विरोधकांनी हंगामा करू नये
सध्या विधानसभेचे पावसाळी आधिवेशन सुरू आहे. या दरम्यान विरोधकांकडून कामकाजात व्यत्यय आणला जात आहे. त्यावर आठवले यांनी विरोधी पक्षांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले, की विरोधकांनी हंगामा करू नये. त्यांच्या काही सूचना शिफारसी असतील तर द्याव्यात, सरकारला सहकार्य करावे.