Ramnath Kovind : निवृत्तीनंतर सोनिया गांधींचे शेजारी होणार रामनाथ कोविंद; जाणून घ्या किती पेन्शन आणि काय सुविधा मिळतील?

नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. 23 जुलै रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू संसद भवन येथील सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ आयोजित करत आहेत. यादरम्यान राष्ट्रपती कोविंद यांना ‘स्मृतीचिन्ह’ आणि खासदारांच्या स्वाक्षरीचे ‘स्वाक्षरी पुस्तक’ देखील प्रदान केले जाईल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार या कार्यक्रमाचा भाग असतील.

कार्यकाळ संपण्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच 22 जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे संपूर्ण सामान नवीन बंगल्यात हलवण्यात येणार आहे. तथापि, कोविंद यांचे राष्ट्रपती भवनातून अधिकृत प्रस्थान 25 जुलै रोजी होईल, जेव्हा नवीन राष्ट्रपती शपथ घेतील.

राष्ट्रपती कोविंद यांचा नवीन पत्ता काय असणार?
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना दिल्लीतील 12 जनपथ येथे बंगला देण्यात आला आहे. हा तोच बंगला आहे जिथे काही वर्षांपूर्वी रामविलास पासवान राहत होते. पासवान दोन दशकांहून अधिक काळ या बंगल्यात राहत होते. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी ते रिकामे केले. आता हा बंगला रामनाथ कोविंद यांना देण्यात आला आहे.

बंगला पूर्णपणे नव्याने डिझाइन करण्यात आला आहे. राष्ट्रपती कन्या स्वाती कोविंद यांनी बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामावर देखरेख केली. या बंगल्याच्या पुढे म्हणजेच 10 जनपथवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान आहे.

निवृत्तीनंतर राष्ट्रपती कोविंद यांना कोणत्या सुविधा मिळतील?
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवृत्तीनंतर दरमहा दीड लाख रुपये पेन्शन मिळणार आहे. याशिवाय सचिवीय कर्मचारी आणि कार्यालयीन खर्चासाठी दरमहा 60 हजार रुपये दिले जातील. याशिवाय सरकारने दिलेल्या बंगल्याचे भाडेही मोफत असेल.

माजी राष्ट्रपती या नात्याने कोविंद यांना दोन लँडलाईन, मोबाईल फोन, ब्रॉडबँड आणि इंटरनेट कनेक्शनही दिले जाणार आहे. याशिवाय वीज आणि पाण्याचे बिलही भरावे लागणार नाही. कोविंद यांना ड्रायव्हर आणि कारही देण्यात येणार आहे. आरोग्य सुविधा पूर्णपणे मोफत असतील. रेल्वे आणि विमान प्रवास मोफत असेल. माजी राष्ट्रपतींसह अन्य एका कर्मचाऱ्यांनाही ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. याशिवाय सर्व सुविधांसह मोफत वाहन दिले जाणार आहे. दिल्ली पोलिसांची सुरक्षा देण्यात येणार आहे. दोन सचिवही असतील.