रवींद्र वायकरांच्या अडचणी वाढल्या ! ईडीने दुसऱ्यांदा पाठवला समन्स.. मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मुंबई – ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वायकर यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स पाठवले असून मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी जोगेश्वरी भूखंड प्रकरणी ईडीने त्यांच्या निवासस्थानी धाड टाकत चौकशीसाठी समन्स दिले होते.

जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १७ जानेवारीला ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी समन्स जारी केले होते.

मात्र, वायकर ईडीच्या कार्यालयात हजर झाले नाही. याउलट चौकशीस हजर राहण्यासाठी त्यांनी एक महिन्याची मुदतवाढ मागितल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना मुदतवाढ दिली किंवा कसे याची माहिती ईडीकडून प्राप्त झाली नाही.

दरम्यान, महाविकास आघाडीतील तीन नेत्यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. आमदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरी भूखंड प्रखरणी होणार आहे, तर बारामती अँग्रो प्रकरणी आमदार रोहित पवार यांची बुधवारी, तर गुरुवारी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी चौकशी होणार आहे.