वैद्यकीय शिक्षण विभागात लवकरच भरतीप्रक्रिया

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्‍यक असणाऱ्या वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदभरती करण्यात येत आहे.

ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत वर्ग 3 पदभरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे.

वर्ग 4 बाबतची पदभरती अधिष्ठाता यांनी आपल्या स्तरावरुन करावी, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येणाऱ्या बांधकामाच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक पार पडली.

या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व अधिकारी उपस्थित होते.
अमित देशमुख म्हणाले, जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी सन 2017 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता.

या करारानुसार तीन वर्षासाठी सर्व कर्मचारी तसेच आवश्‍यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली होती. आता हा करार जरी संपला असला तरी नवीन करारासंदर्भातील प्रस्ताव त्वरित पाठविण्यात यावा आणि प्रस्तावाला परवानगी मिळावी यासाठी जळगाव अधिष्ठाता यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

“समान काम, समान वेतन’
कोविड काळात राज्यातील सर्वच विभागातील डॉक्‍टरांनी काम केले आहे. यामुळे या सर्वांना “समान काम, समान वेतन’ मिळावे याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.

सर्वच विभागातील डॉक्‍टरांना समान काम आणि समान वेतन मिळावे यासाठी विभाग आग्रही आहे. याशिवाय शासन अनुदानित आयुर्वेदिक महाविद्यालयाबरोबरच खासगी आयुर्वेदिक महाविद्यालयातील इंटर्न विद्यार्थ्यांनाही समान विद्यावेतन मिळावे यासाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले.