हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका होणार कमी ;कॅनडातील संशोधकांकडून नवी उपचार पद्धती विकसित

ओटावा – कॅनडातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही संशोधकांनी एक नवी उपचार पद्धती विकसित केली असून त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांचा धोका 50 टक्के कमी होईल असा दावा करण्यात येत आहे. या संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ऍस्पिरिन स्टॅटिस आणि रक्तदाबावरील दोन औषधांचा एकत्र उपयोग करून ही उपचार पद्धती तयार करण्यात आली आहे.
या संशोधकांनी रुग्णांच्या दोन गटांवर ही उपचार पद्धती वापरली त्यानंतर हे निष्कर्ष समोर आले. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाशी संबंधित महत्त्वाचे मासिक असणाऱ्या लॅन्सेट या नियतकालिकात याबाबतचे संशोधन सविस्तर प्रसिद्ध करण्यात आले आहे. संशोधनात एकूण अठरा हजार रुग्णांच्या समूहावर उपचार करण्याचा प्रयोग करण्यात आला.

त्यापैकी निम्म्या लोकांवर नवी उपचारपद्धती म्हणजेच ऍस्पिरिनची उपचार पद्धती करण्यात आली तर उर्वरित लोकांवर बिगर ऍस्पिरिन उपचार पद्धती करण्यात आली. ऍस्पिरिनचा समावेश असलेला उपचार घेणाऱ्या रुग्णांमधील हार्ट अटॅकचे प्रमाण 53 टक्के आणि स्ट्रोकचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे या संशोधनात समोर आले. जगात दरवर्षी सुमारे दोन कोटी लोक हृदयविकारामुळे मरण पावतात.

त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त लोक अचानक येणारा हार्ट अटॅक स्ट्रोक यामुळे मरण पावतात. या पार्श्‍वभूमीवर हे संशोधन आतिशय महत्त्वाचे मानण्यात येत आहे. कॅनडातील मेकमास्टर युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर फिलिप जोसेफ यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आगामी कालावधीमध्ये हृदयविकारावर आणि स्ट्रोकवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही उपचार पद्धती महत्त्वाची ठरणार आहे.