लस घेण्यास नकार; न्यूयॉर्कच्या हेल्थ कंपनीत १४०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

कोरोनाविरोधी लसीकरण अधिक महत्त्वाचे आहे. कारण कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आता सर्व देशांसमोर उरला आहे. भारत, अमेरिकासह अनेक देशांमध्ये कोरोनाविरोधी लसीकरण मोहिम मोठ्या वेगाने सुरु आहे. मात्र भारताप्रमाणेच अमेरिकेतही लल घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.

मात्र अमेरिकन सरकारने लसीकरणास नकार देणाऱ्या नागरिकांविरोधात कडक पाऊले उचलली आहेत. अमेरिकेतील एका आरोग्यसेवा देणाऱ्या कंपनीने लस घेण्यास नकार देणाऱ्या तब्बल १४०० कर्मचाऱ्यांची नोकरीवरून हकालपट्टी केली आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील सर्वात मोठी ‘हेल्थ केअर प्रोव्हायडर नॉर्थवेल हेल्थ’ या आरोग्य सेवा कंपनी आपल्या १४०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. या कर्मचाऱ्यांनी कोरोनाविरोधी लस घेण्यास नकार दिला होता. हेल्थकेअरचे प्रवक्ता जो कँप यांनी सांगितले की, लसीकरण सर्वांसाठी गरजेचे आहे.

यामुळे नार्थवेल हेल्थ कंपनीनेही आपल्या क्लिनीकल आणि नॉन क्लिनीकल स्टाफला लस घेण्याच्या सुचना केल्या होत्या. परंतु हे कर्मचारी लस घेण्यास तयार नव्हते त्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना काढून टाकणे हा आमचा उद्देश नव्हता, परंतु लस न घेतल्यामुळे हे करावे लागले.

न्यूयॉर्कच्या नॉर्थवेल हेल्थ कंपनीत तब्बल ७६ हजार कर्मचारी काम करतात. यातील १४०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. यातील उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. अमेरिकन सरकारने न्यूयॉर्कमध्ये आरोग्यसेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी लसीकरण अनिवार्य केले आहे. गेल्या आठवड्यात यासंदर्भातील आदेश जाहीर करण्यात आला आहे. कॅलिफॉर्नियासह अन्य अनेक राज्यांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे.