ब्राह्मणांसंदर्भात मोहन भागवतांनी म्हटले,”वर्ण आणि जातीव्यवस्थेचा त्याग केला पाहिजे”

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी समाजव्यवस्थेविषयी मोठे विधान केले आहे. ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होतो, त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल, अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही,’ असे वक्तव्य यावेळी त्यांनी केले आहे.

विदर्भ संशोधन मंडळाच्यावतीने ‘वज्रसूची-टंक’ या डॉ. मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी ,“आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली” म्हटले आहे.

“वर्ण व जातीव्यवस्था आता भूतकाळ झाला आहे. कोणालाही विषमता नको. हीच सर्वाच्या मनातील गोष्ट डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली. ती आपण स्वीकारली आणि त्यानुसार आपण आचरण करण्याचा जोरकसपणे प्रयत्न करित आहोत”, असेही डॉ. भागवत म्हणाले.

“ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होतो, त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही”, असेही त्यांनी नमूद केले .