विवाह मंडळींचीही नोंदणी आता बंधनकारक; ऑनलाइन, ऑफलाइन संस्थांना नोटीस

पुणे – वर सूचक केंद्रांसह विवाह मंडळे तसेच ऑनलाइन विवाह संस्थांना महापालिकेकडे नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्र विवाह मंडळाच्या अधिनियमानुसार ही बंधनकारक आहे. पण, मनपा आरोग्य विभाग तसेच विवाह मंडळांकडूनही ही नोंदणी केली जात नव्हती. मात्र, विवाह नोंदणीत गैरप्रकार तसेच फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने महापालिकेने या अधिनियमाची कडक अंमलबजावणी केली आहे.

त्यानुसार ही नोंदणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली. ऑनलाइन तसेच ऑफलाइन विवाह मंडळांसाठी ही नोंदणी बंधनकारक असणार आहे. ही नोंदणी सुविधा क्षेत्रीय कार्यालयांमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विवाह नोंदणी बंधनकारक आहे, त्याप्रमाणेच विवाह मंडळांची नोंदणीही कायद्याने बंधनकारक आहे. त्यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन विवाह मंडळांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. नोंदणी करण्याच्या सूचना त्यांना केल्या आहेत. त्यासाठीची सर्व अर्ज व माहिती क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. – डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य प्रमुख, मनपा