पिंपरी | नदीपात्रालगत टाकलेला भराव काढून टाका

किवळे, (वार्ताहर) – प्रशासन निवडणूक कामात गुंतल्‍याचे पाहून काही जणांनी देहूतील इंद्रायणी नदीत संत तुकाराम महाराज देऊळवाड्याच्या विरुद्ध दिशेला काही नागरिकांनी राडारोडा टाकलेला आहे. यामुळे नदीचे पात्र अरूंद झाले आहे.

पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे संत तुकाराम महाराज देऊळवाडा, पित्ती धर्मशाळा व इतर भागाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जागामालकांनी १५ दिवसांत टाकलेला भराव काढून घ्यावा. अन्यथा कायदेशीर कारवाईस करण्यात येईल, अशा सूचना पाटबंधारे शाखेचे सहायक अभियंता यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात नदी-नाले बुजवून त्‍यावर बांधकाम करण्‍याचे प्रमाण वाढले आहेत. याचे लोण आता ग्रामीण भागातही पसरले असल्‍याचे दिसून येते. देहूगाव जवळील इंद्रायणी नदीच्या पलीकडे येलवाडी गावात नदीपात्रा लगत निळ्या पूररेषेच्‍या आता अनेक बांधकामे सुरू आहेत.

तसेच काही जागामालकांनी नदीपात्रात राडारोडा टाकून पात्र अरुंद करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन रिंगरोडच्या इंद्रायणी पुलाच्या कडेला मोठा भराव नदीत टाकण्यात आला आहे. याबाबतचे वृत्‍त दै. ’प्रभात’ने सचित्र प्रसिद्ध केले.

त्‍यानंतर अनेक सामाजिक संघटना आणि इंद्रायणी सुरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब पाटबंधारे विभाग आणि येलवाडी तलाठी, ग्रामसेवकांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. तसेच याबाबत पाटबंधारे विभागाला कळविले आहे. याची गंभीर दखल घेत पाटबंधारे विभागाने येलवाडी ग्रामपंचायत प्रशासन, पीएमआरीडीचे कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.