संशोधन: वाढत्या तापमानामुळे गाईंच्या दूध देण्याच्या क्षमतेत 35 टक्के घट

वॉशिंग्टन – हवामानातील बदल त्यातही तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या परिस्थितीचा परिणाम फक्त मानवजातीवरच होत आहे असे नाही तर या बदलाचा परिणाम जनावरांनाही सहन करावा लागत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे तापमान वाढीचा फटका जनावरांना बसत असून गाईंच्या दूध देण्याच्या क्षमतेत त्यामुळे 35% घट होत आहे. तसेच आफ्रिका खंडातील हत्तींच्या मृत्यूचे प्रमाणही तापमान वाढीमुळे वाढले आहे.

तापमान वाढीचा जनावरांवर होणारा परिणाम या विषयावर झालेल्या संशोधनातील निष्कर्ष सीएआयबी रिव्ह्यूज या प्रख्यात नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या अभ्यासामध्ये विविध जनावरांवर होणारे मानसिक आणि शारीरिक परिणाम यांचा विचार करण्यात आला. त्यावेळी हे निष्कर्ष समोर आले.

वाढत्या तापमानामुळे जनावरांमधील मानसिक तणाव वाढत असून त्यामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे. एवढेच नाही तर गाई आणि इतर दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमताही तब्बल 35% ने कमी झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आफ्रिका खंडातील अनेक हत्तींचा मृत्यू झाला असून जगात अनेक ठिकाणी कुत्र्यांचे वजनही अनैसर्गिकपणे वाढताना दिसत आहे.

पक्ष्यांमध्ये वाढते तापमान सहन करण्याची क्षमता खूप कमी असते. त्यामुळे पक्ष्यांनाही या वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. तापमानामुळे दुसरीकडे पावसाचे प्रमाणही कमी होत असल्याने अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे स्त्रोत कमी झाल्यामुळे अनेक जनावरांचे अस्तित्वही संकटात आले आहे.

वाढत्या तापमानामुळे एकीकडे कुत्र्यांचे वजन वाढत असतानाच उन्हाळी मोसमामध्ये कुत्र्याने माणसाला चावण्याच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले आहे. वाढत्या तापमानांचा विविध जनावरांवर मानसिक परिणाम होत असून त्याचा फटका अप्रत्यक्षरीत्या मानव जातीलही बसू लागला आहे.