संशोधन! पाच नैसर्गिक बदलांचा पृथ्वीला बसणार मोठा फटका; जमीन खचणे, तापमान वाढीसारख्या घटना वाढणार

नवी दिल्ली – गेल्या काही कालावधीमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात कोठे ना कोठे नैसर्गिक आपत्ती सुरू आहेत. तुर्कस्तानमधील विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वी विविध प्रकारच्या नैसर्गिक बदलांमुळे संकटात आल्याची माहिती समोर आली आहे. क्रॉस पेंडन्सी इनिशीएटिव्ह या संस्थेने याबाबतचे संशोधन केले असून ते नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या संशोधनात दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या काही कालावधीमध्ये झालेल्या आणि आगामी कालावधीमध्ये होणाऱ्या पाच नैसर्गिक बदलांचा मोठा फटका पृथ्वीला बसणार आहे. त्याचे संकेत आतापासूनच मिळायला सुरुवात झाली आहे.

अनेक देशांमधील काही प्रदेशांमध्ये जमीन खचण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. भारतामध्ये उत्तराखंडमधील जोशीमठ हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्या व्यतिरिक्त अमेरिकेतसुद्धा अनेक ठिकाणी अशा जमीन खचण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. मेक्‍सिकोमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेल्या तापमानाचा फटकाही पृथ्वीला बसत आहे. 2022 हे गेल्या 100 वर्षातील सर्वात गरम वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले होते.

हे वाढते तापमानही पृथ्वीसाठी धोकादायक ठरू पाहत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे या वाढत्या तापमानामुळेच पृथ्वीवरील हिमक्षेत्रे मोठ्या प्रमाणात वितळू लागली आहेत. या अहवालात दिलेल्या माहितीप्रमाणे 2100 साल उजाडण्यापूर्वी पृथ्वीवरील एक तृतीयांश हिमक्षेत्रे पूर्णपणे वितळून गेली असतील. हिमक्षेत्रे मोठ्या प्रमाणात वितळू लागल्याने त्याचा परिणाम समुद्रपातळी उंचावण्यावरही झाला आहे.

समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे सागरी वादळे आणि तुफान यांचे प्रमाणही गेल्या काही कालावधीमध्ये वाढले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हवामानातही अनैसर्गिक पद्धतीने बदल होऊ लागल्याने त्याचाही पृथ्वीला फटका बसला लागला आहे. सर्वसाधारणपणे सर्वच ऋतू आता तीव्रपणे समोर येत आहेत.

उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे सर्व या सर्वच ऋतूंची तीव्रता गेल्या काही कालावधीमध्ये वाढली आहे. साहजिकच पावसाळ्यात अतिवृष्टी, हिवाळ्यामध्ये थंडीची लाट आणि उन्हाळ्यामध्ये उष्णतेची लाट आता स्वाभाविक गोष्ट झाली आहे. जगातील सर्वच देशांनी पर्यावरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर पृथ्वीला निर्माण झालेले हे पाच धोके अधिक गंभीर होऊ शकतात असा इशारा देण्यात आला आहे.