संशोधन! मुलांनी माती आणि चिखलामध्ये खेळणे फायदेशीर

वॉशिंग्टन – मुलांच्या आरोग्याची जपणूक करण्यासाठी पालक सर्वसाधारणपणे त्यांना माती आणि चिखल यापासून दूर ठेवतात. पण एका नवीन संशोधनाप्रमाणे ज्या लहान मुलांचा माती चिखल किंवा वाळूशी संपर्क होतो त्यांची प्रतिकार क्षमता जास्त होते. याशिवाय त्यांना कधी नैराश्‍याचा किंवा चिंतेचा सामना करावा लागत नाही.

या संशोधनाप्रमाणे माती चिखल आणि वाळूमध्ये असे काही सूक्ष्मजीव असतात जे लहान मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. माती आणि चिखल वाळूमध्ये खेळणाऱ्या मुलांची प्रतिकारक्षमता वाढतेच शिवाय त्यांना ऍलर्जीचा किंवा दम्याचा धोका होत नाही.

या व्यतिरिक्त नंतरच्या काळात त्यांना चिंता किंवा निराशा याचा सामनाही करावा लागत नाही. एलिसिया फ्रांको आणि डेव्हिड रेबसन या दोन संशोधकांनी हे संशोधन केले असून मातीत किंवा चिखलात खेळण्याच्या या प्रक्रियेला त्यांनी सॅंड थेरपी असे नाव दिले आहे. हे संशोधक इटलीतील एका विद्यापीठाशी संबंधित असून त्यांनी या विषयावर दीर्घकाळ संशोधन केले आहे. ज्या लहान मुलांचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले आहे त्यांना तरुणपणाच्या कालावधीमध्ये कोणतीही समस्या जाणवत नाही आणि त्यांचे व्यक्तिमत्व अधिक चांगल्या प्रकारे विकसित होते असेही त्यांनी म्हटले आहे.

मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रिन स्पेस आणि ब्ल्यू स्पेस अतिशय महत्त्वाची असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. ग्रीन स्पेस म्हणजे ज्या ठिकाणी हिरवागार निसर्ग आहे अशा जागा आणि ब्लू स्पेस म्हणजे पाण्याच्या जागा. साहजिकच तलावाच्या आसपास राहणारे नद्यांच्या आसपास राहणारे किंवा समुद्र परिसरात राहणाऱ्या मुलांचा जास्त चांगल्या प्रकारे विकास होतो असे या संशोधकांनी म्हटले आहे.

नैसर्गिक ठिकाणे माणसाच्या मुलांना मेंदूला विशेषतः लहान मुलांच्या मेंदूला रिचार्ज करण्याचे काम करतात. ब्ल्यू हेल्थ इंटरनॅशनल सर्वे या संस्थेने नुकताच जगातील अठरा देशांचा सर्वे केला असून ज्या लहान मुलांचा वावर निसर्गाच्या सानिध्यात आहे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक चांगल्या प्रकारे विकसित होते आणि ते निरोगी असतात असे संशोधनात म्हटले आहे.