वैद्यकीय क्षेत्रात समर्पण भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे – राज्यपाल कोश्यारी

मुंबई  : रूग्णसेवा हीच पवित्र सेवा आहे. आपली सेवा जेव्हा आपण असीम शक्तींना समर्पित करतो तेव्हा यश निश्चीतच प्राप्त होते. वैद्यकीय क्षेत्रात समर्पक भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे असल्याचे सांगून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महिला डॉक्टरांचे त्यांच्या समाजकार्याबद्दल अभिनंदन केले.

आज राजभवन येथे मेडीक्वीन या महिलांच्या आरोग्यासाठी काम करत असलेल्या संस्थेतर्फे राज्यभरातील समाजकार्य करणाऱ्या महिला डॉक्टरांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यपाल बोलत होते. या कार्यक्रमास मेडीक्वीन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर, गोवर्धन इको व्हिलेजच्या महिला सक्षमीकरण विभागाच्या प्रमुख संध्या सुब्रमन्यम, मेडीक्वीन संस्थेच्या सचिव प्राजक्ता शहा उपस्थित होत्या.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, मेडीक्वीन या संस्थेचा ‘महिलांचे आरोग्य’ हेच ब्रीद वाक्य असल्याने, त्या महिलांच्या आरोग्याविषयी करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. शारिरीक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षमिकरणाच्या दृष्टीने त्यांचे कार्य सुरू असुन, प्रत्येक क्षेत्रातील महिलांची होत असलेली प्रगती ही समाजात पुन्हा मातृवंदनेचा कालखंड येणार असल्याचे संकेत आहेत.

कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असताना समर्पण आणि ममत्व भावाने काम केल्यास यश निश्चीतच प्राप्त होते. याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात अधिक संशोधन होणेही काळाची गरज असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

लातूरच्या ज्योती सुळ, शिरपूरच्या जया जाने, वर्धेच्या कोमल मेश्राम, मुंबईच्या मिनाक्षी देसाई, पुण्याच्या स्मिता घुले यांच्यासह 22 महिला डॉक्टरांचा या कार्यक्रमात प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.