रिसर्च : शाकाहारी लोकांना कर्करोगाचा धोका कमी

लंडन – शाकाहार चांगला की मांसाहार चांगला याबाबत नेहमीच वाद विवाद होत असले तरी आता एका नव्या संशोधनाप्रमाणे शाकाहारी व्यक्तींना मांसाहारी व्यक्तींच्या तुलनेत कर्करोगाचा कमी धोका असतो. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड, कॅन्सर रिसर्च युके ऑक्‍सफर्ड हेल्थ यांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनातील निष्कर्ष बीएमसी या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

गेल्या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये तब्बल चार लाख 72 हजार लोकांवर संशोधन करण्यात आले. या लोकांना विविध अशा गटांमध्ये विभागण्यात आले होते. आहाराच्या सवयीप्रमाणे हे गट करण्यात आले होते. पहिल्या गटामध्ये आठवड्यात पाच किंवा पाचपेक्षा जास्त वेळा मांसाहार करणाऱ्या लोकांचा समावेश होता. दुसऱ्या गटामध्ये आठवड्यात पाच पेक्षा कमी दिवस मांसाहार करणाऱ्या लोकांचा समावेश करण्यात आला होता.

तिसऱ्या गटामध्ये फक्त मासे खाणाऱ्या लोकांचा समावेश होता, तर चौथ्या गटांमध्ये शाकाहारी लोकांना समावेश करण्यात आला होता. कमी मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये कर्करोगाचा धोका 2 टक्‍क्‍याने कमी होतो तर शाकाहारी लोकांमध्ये हा धोका तब्बल चौदा टक्‍क्‍यांनी कमी होतो असे या संशोधनावरून समोर आले.

शाकाहारी महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतरच्या काळात स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण तब्बल 18 टक्‍क्‍याने कमी आढळले. कमी मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये आतड्याचा कॅन्सरचे प्रमाणही त्या प्रमाणात कमी असल्याचे लक्षात आले. प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण सर्वात जास्त मांसाहार करणाऱ्यांमध्ये आढळते. मत्स्यहार करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण थोडे कमी आणि शाकाहार करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण खूपच कमी आढळले.