कराडच्या उपाययोजनांचा घेतला आढावा

कराड – कराड तालुक्‍यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कंटेनमेंट झोनमध्ये कडक निर्बंध जारी केले आहेत. यात शहरासह नजीकच्या 11 गावांचा समावेश आहे. याशिवाय करोनाबाधित रूग्ण आढळून आलेल्या गावांना जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी भेट दिली. संचारबंदी व लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक पध्दतीने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, तेजस्वी सातपुते यांनी कराड शहरातील विविध भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच कराड तालुक्‍यात लॉकडाऊन व संचारबंदीचे काटेकोरपणे पालन होत असल्याबद्दल समाधान व्यक्‍त केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड तालुका पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कराड तालुक्‍यातील वाढत करोना बाधितांचा आकडा लक्षात घेता कडक उपाय योजना म्हणून कराड शहर, मलकापूर शहर तसेच लगतच्या आकरा गावांना कमेटमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. कमेंटमेंट झोनच्या काळात फक्‍त हॉस्पीटल, गॅस, दूध तसेच अत्यावश्‍यक सेवेत काम करणारे कर्मचारी वगळता सर्व बंद करण्यात आले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सोमवारी कराडला भेट दिली.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, कराड व मलकापूर शहरांसह प्रत्येक गावामध्ये चांगल्या पध्दतीने लॉकडाऊनचे पालन केले जात आहे. ग्राम समिती ग्रामस्थांची काळजी घेत आहे. तसेच गरजू लोकांना अन्नधान्य तसेच तयार जेवण व मेडिकल व्यवस्था पुरवण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत तालुक्‍यात कंट्रोल रुम सुरू करण्यात आली आहे. लोकांनी घरातून बाहेर न पडता त्यांना कशी मदत पोहोचवता येईल, यासाठी योजना कार्यान्वयीत करणार असल्याचे तेजस्वी सातपुते यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment