भात तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’

आरोग्यावर दुष्परिणाम करणारे घटक नसल्याचे समोर

पुणे – कात्रजमधील राजस सोसायटी येथील रामभाऊ म्हाळगी शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारामधील भातामध्ये आरोग्यावर दुष्परिणाम करणारे कुठलेही घटक नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालातून समोर आले आहे. याप्रकरणी सर्व घटकांची चौकशी करण्यात आली असून शिक्षण विभाग आणि शालेय पोषण विभागाच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून हा शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या संस्थेसह अन्य 5 संस्थांचे काम स्थगीत करण्यात आले आहे. चौकशी अहवाल आयुक्‍तांकडे पाठविण्यात आला असून तेच यावर अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अग्रवाल यांनी दिली.

रामभाऊ म्हाळगी शाळेतील एका विद्यार्थ्यासह मुख्याध्यापिकेने शालेय पोषण आहारांतर्गत आलेला मसाले भात खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या आणि चक्‍कर असा त्रास सुरू झाला होता. 15 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाल्याने तो विद्यार्थी आणि मुख्याध्यापिकेसह हा भात खाणाऱ्या त्याच शाळेतील अन्य 20 विद्यार्थ्यांनाही तातडीने उपचारासाठी भारती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर या सर्वांना त्याच दिवशी संध्याकाळी सोडूनही देण्यात आले होते.

या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार झाली असून अन्न व औषध प्रशासनानेही या घटनेनंतर मसाले भाताचे तसेच हा शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या संस्थेच्या किचनमधून अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमली होती.

Leave a Comment