पावसाच्या प्रतीक्षेत भातरोपे सुकू लागली

खेडच्या आदिवासी भागात पावसाची हुलकावणी : दुबार पेरणीचे संकट

राजगुरूनगर – खेड तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील भात उत्पादक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून भाताची रोपे सुकू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आकाशात ढग भरून येतात; मात्र पाऊसच पडत नसल्याने दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.

खेड तालुक्‍यात सर्वाधिक भात पिक घेतले जाते. जवळपास सात ते आठ हजार हेक्‍टर क्षेत्रात भाताचे पिक घेतले जाते. तर सुमारे एक हजारापेक्षा जास्त हेक्‍टर क्षेत्रात भाताची रोपे पेरली जातात. ही भातरोपे पावसाअभावी जाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे भात रोपे लावणी (आवणी) करताना त्यांची कमतरता भासणार आहे.

अनेक शेतकरी दरवर्षी भात रोपे विकत घेतात. यावेळी त्याची पावसा अभावी जास्त टंचाई भासणार आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून या भागात यावर्षी पाऊस झाला नाही. मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली होती. त्यानंतर आठवडाभरापूर्वी या भागात थोडाच पाऊस झाला. पेरणी केलेली भाताची रोपे उगवली; मात्र त्यानंतर या भागात पाऊस पडला नसल्याने भात रोपे जळून चालली आहेत. अनेक शेतकरी पावसाभावी जळून चाललेली भात रोपे वाचविण्याचे प्रयत्न करीत आहेत. भात रोपांना टॅंकरने पाणी विकत घेवून जागवण्याचा प्रयत्न केला आहेत.

यावर्षी भात पिकाच्या नियोजनाची तालुका पातळीवर बैठक झाली नसल्याने शेतकऱ्यांना पावसाचे अंदाज आणि खरीप हंगामात कोणती पिके घ्यायची याबाबत माहिती मिळाली नाही. शेतकऱ्यांनी स्वताच्या अंदाजावर पारंपारिक भाताचे वाण गोळा करून त्याची पेरणी केली; मात्र ती उगवल्यानंतर पाऊस पडला नसल्याने ती आता जळू लागली आहेत.
कृषी विभागाकडून भात उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन होत नसल्याने पिकाचे अंदाजे नियोजन या भागातील शेतकरी करीत आहेत. शासनाकडून केवळ कागदपत्रे रंगविण्यात येतात प्रत्यक्षात कारवाई होत नाही. गेली अनेक वर्षापासून भात उत्पादक शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करण्याचे निर्णय होत आहेत मात्र ती स्थापन केली जात नाही. उन्हाळ्यात केवळ घोषणाबाजी होते प्रत्यक्षात मात्र त्यावर निर्णय होत नसल्याने शेतकरी वर्गाला माहिती मिळत नाही अथवा त्यांच्या मालाला चांगली किमत मिळत नाही. उत्पादन खर्च वाढला आहे.

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांची भात रोपे पावसाभावी करपली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जळालेल्या भात रोपांचे शासनाने तात्काळ पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. दुबार पेरणीसाठी भाताचे बियाणे उपलब्ध करून द्यावे. याबाबत कृषी व महसूल विभागाकडे निवेदन पाठवले आहे.
-अतुल देशमुख, जि. प. सदस्या नायफड-वाशेरे गट

कृषी विभागाकडून अपेक्षा
तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागात सध्या भात रोपे जळू लागली असून प्रशासनाने या भात रोपांचे पंचनामे करावेत, भात पिकासाठी घेतलेले पिक कर्ज सरसकट माफ करावे. खरीप रब्बी हंगाम पेरणीपूर्व नियोजन करावे, खत बी बियाणे याबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळावी हवामानाचे अचूक अंदाज कृषी विभागाकडून मिळावेत अशी मागणी भात पिक उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Comment