‘झिम्मा 2’ मध्ये दिसणार रिंकू राजगुरु; चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज

Entertainment : ‘झिम्मा’ या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता लवकरच ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरनंतर आता या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरूची (Rinku Rajguru) एन्ट्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘झिम्मा 2’च्या नव्या पोस्टरमध्ये सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी व शिवानी सुर्वे, सायली संजवी आणि रिंकू राजगुरू हि कलाकार मंडळी दिसत आहे. ‘झिम्मा 2’ या सिनेमाचं पोस्टर शेअर करत हेमंत ढोमेने लिहिलं आहे, “तिच मज्जा आहे दुसऱ्याही डावात…आईच्या नाही… आज्जीच्याही गावात! तुमचे आमचे REUNION.. बरोबर एक महिन्यात… 24 नोव्हेंबर पासून चित्रपटगृहात! झिम्माच्या मॅड फॅमिलीत तुमचं स्वागत आहे रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे”.

या चित्रपटात आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या अभिनेत्रींची एन्ट्री झाल्याने चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. हा चित्रपट हेमंत ढोमे (Hemant Dhome) याने दिग्दर्शित केला आहे. दरम्यान, ‘झिम्मा’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ‘झिम्मा 2’ काय कमाल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. येत्या 24 नोव्हेंबरला ‘झिम्मा 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.